संतप्त जमावाने बस पेटवली!
By Admin | Updated: May 29, 2014 03:32 IST2014-05-29T03:32:17+5:302014-05-29T03:32:17+5:30
भरधाव खासगी बसने दुचाकीला उडवल्याने रेखा शंकर कुरुणकर (४५) ही महिला जागीच ठार झाली, तर मुलगा अमर (१८) व विवाहित मुलगी अपर्णा विजय मस्कर (२१) हे गंभीर जखमी झाले

संतप्त जमावाने बस पेटवली!
गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) : भरधाव खासगी बसने दुचाकीला उडवल्याने रेखा शंकर कुरुणकर (४५) ही महिला जागीच ठार झाली, तर मुलगा अमर (१८) व विवाहित मुलगी अपर्णा विजय मस्कर (२१) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर संतप्त जमावाने खासगी बस पेटवून दिली. गारगोटी-गडहिंग्लज मार्गावर कडगावनजीक जखेवाडी फाट्यावर बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली़ कडगाव येथील कुरुणकर यांचे घर जखेवाडी रोडवर आहे. मोठ्या मुलीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचा बाजारासाठी रेखा व अपर्णा या अमरच्या दुचाकी वरून गावात येत होत्या. दरम्यान, गारगोटीहून गडहिंग्लजकडे जाणार्या भरधाव खासगी बसने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिल्याने रेखा यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी बसखाली अडकून फरफटत गेल्यामुळे अमर व अपर्णा यांना गंभीर दुखापत झाली. अपर्णा हिच्यावर कोल्हापूर येथे, तर अमर याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने बस पेटवली. मात्र आग विझविण्यासाठी बोलविलेली अग्निशामक गाडी नादुरुस्त असल्यामुळे आलीच नाही. (वार्ताहर)