...आणि मदतीचा हात निखळला!

By Admin | Updated: July 19, 2014 02:45 IST2014-07-19T02:45:38+5:302014-07-19T02:45:38+5:30

सगळ्यांच्या जीवाभावाचा, प्रत्येक अडचणीला मदतीसाठी धावून जाणारा आणि आपत्कालीन परिस्थितीदरम्यान लोकांचे जीव वाचविण्यासाठी सदैव तत्पर असणारा नितीन हा ‘मदतीचा हात’ होता

... and the hand of your hand washed away! | ...आणि मदतीचा हात निखळला!

...आणि मदतीचा हात निखळला!

मुंबई : सगळ्यांच्या जीवाभावाचा, प्रत्येक अडचणीला मदतीसाठी धावून जाणारा आणि आपत्कालीन परिस्थितीदरम्यान लोकांचे जीव वाचविण्यासाठी सदैव तत्पर असणारा नितीन हा ‘मदतीचा हात’ होता. त्यांच्या या स्वभावाची सहकाऱ्यांनाही कल्पना होती. म्हणूनच अंधेरी येथे कर्तव्यासाठी दाखल झालेले अग्निशमन दलाचे जवान नितीन इवलेकर यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘जास्त पुढे जाऊ नकोस...’ असे सांगितले होते. परंतु ते नेहमीप्रमाणे सरसावले आणि घात झाला...
‘लोटस’ ला लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचे जवान नितीन इवलेकर शहीद झाले. आणि त्यांच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला. नितीनचे बाबा महापालिकेत नोकरीला होते. त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावर नितीन यांनी २००५ साली अग्निशमन दलात प्रवेश केला. २०१० साली बोरीवली येथील अग्निशमन दल केंद्रात त्यांची बदली झाली. नितीन यांनी जे.जे. आर्टस्मधून इंटिरिअर डिझाईनचा अभ्यासक्रम पूर्ण
केला होता. त्यांना सजावटीची आवड होती.
म्हणून बोरीवली येथील अग्निशमन दलाच्या केंद्रातील बागकामाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांनी ती पेलल्याने येथील बाग बहरून गेली होती. शिवाय मित्रांच्या घरी कार्यक्रमादरम्यानची सजावट असो वा एखादा कार्यक्रम; त्यात नितीन त्यांना विनातक्रार मदत करत. त्यामुळे एखादे काम निघाले की साहजिकच नितीनला हाक मारली जायची. मात्र
आता त्यांच्या जाण्याने त्यांच्या घरासह त्यांचा सहकारी वर्गही पोरका झाला आहे.
मानखुर्द येथे पत्नी भूभागी आणि दोन मुलींसोबत वास्तव्य करणारे नितीन यांनी नुकतेच विरार येथील ग्लोबल सिटी संकुलात नवे घर घेतले होते. आणि पंधराएक दिवसांपूर्वी त्यांनी नव्या घरात प्रवेश केला होता. मात्र आता त्यांच्या जाण्याने घरावर आभाळ कोसळले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: ... and the hand of your hand washed away!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.