अमरावतीची फॅशन डिझायनर रुपल ‘मिसेस इंडिया अर्थ’च्या फायनलमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 19:18 IST2017-09-20T18:16:06+5:302017-09-20T19:18:22+5:30
प्रतीष्ठेची मानली जाणारी ‘मिसेस इंडिया अर्थ’ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत अमरावतीची रुपल गुडढे-बोके हिने स्थान मिळविले आहे.

अमरावतीची फॅशन डिझायनर रुपल ‘मिसेस इंडिया अर्थ’च्या फायनलमध्ये
अमरावती, दि. 20 : प्रतीष्ठेची मानली जाणारी ‘मिसेस इंडिया अर्थ’ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत अमरावतीची रुपल गुडढे-बोके हिने स्थान मिळविले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त असणारी ही सौंदर्य स्पर्धा भारतीय वंशज असणा-या सौभाग्यवतींसाठीच आयोजित केली जाते.
आठ वर्षांच्या मुलीची आई असणारी रुपल ही पेशाने फॅशन डिझायनर आहे. बारावीपर्यंतचे शिक्षण अमरावती येथे झाले. यानंतर तिने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केले. सन २००७ साली सागर बोके यांच्याशी तिचा विवाह झाला. जगभरातून मिसेस इंडिया अर्थ या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या ४८ स्पर्धकांमध्ये रुपलने आपली निवड सार्थ ठरवीत अंतिम फेरी गाठली. ६ आॅक्टोबर रोजी स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी निवड झालेली ती पहिली अमरावतीकर ठरली आहे. रुपल येथील विनोद व अलका गुडधे यांंची कन्या आहे. सध्या ती तिचे पती सागर बोके यांच्यासह मुंबईत स्थायिक आहे.
मागील पाच वर्षांपासून ती फॅशन डिझायनिंग क्षेत्रात करीअर करीत असून टीव्ही मालिका व अनेक मोठ्या ईव्हेंटसाठी वस्त्रे डिझाईन केली आहेत. नुकताच तिने आपला नवीन ब्रँडही बाजारात आणला आहे. मी सर्वप्रथम एक आई आहे. त्यानंतर गृहिणी व उद्योजग आहे. ज्या क्षेत्रात काम करायचे आहे त्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी प्रयत्न करीत राहावे, माझ्या यशाचे श्रेय पती, आई-वडील व माझी मुलगी यांना आहे असे तिने ‘लोकमत’ला सांगितले.