Amol Kolhe ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य करताना भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या नावाचा उल्लेख केला होता. धस यांनी माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत प्राजक्ता माळी हिनं आज पत्रकार परिषद घेऊन कारवाईचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी पत्रकारांकडून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे.
अमोल कोल्हे म्हणाले की, "सुरेश धस यांनी जे वक्तव्य केलं आहे ते मी माध्यमांतूनच पाहिलं. त्यांनी राजकीय इव्हेंटवर वक्तव्य केलं आहे की, कशा प्रकारे अभिनेत्र्यांना बोलवून इव्हेंट केले जातात. त्यामुळे ते स्टेटमेंट अधिक ट्विस्ट करण्याची मला गरज वाटत नाही. मी अजून प्राजक्ता माळींची पत्रकार परिषद ऐकली नाही. मात्र सुरेश धस यांचं जे वक्तव्य मी ऐकलं त्यातून चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही," अशा शब्दांत कोल्हे यांनी सुरेश धस यांची पाठराखण केली आहे.
दरम्यान, सुरेश धस यांनी दुसरं कोणतं वक्तव्य असेल आणि त्यातून त्यांनी शिंतोडे उडवले असतील तर कोणाच्याही चारित्र्यावर शिंतोडे उडवणं योग्य नाही, असंही अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे.
प्राजक्ता माळीकडून कारवाईची मागणी
अभिनेत्री प्राजक्त माळीने पत्रकार परिषदेतून सुरेश धस यांच्यावर निशाणा साधत म्हटलं की, "धस यांनी वैयक्तिक राजकारणासाठी महिला कलाकारांची नावं घेणं बंद करा. हे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना शोभत नाही. सुरेश धस यांनी विनम्रपणे माझी माफी मागावी. मी आज महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांनी योग्य ती कारवाई करावी. मीदेखील कायदेशीर कारवाई करत राहीन. मा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मी विनंती करते. माझी आई झोपलेली नाही. माझ्या भावाने सगळे सोशल मीडिया अकाऊंट्स डिलिट केलेत. माझ्या कुटुंबावरही याचा अत्यंत वाईट परिणाम होतोय. या सगळ्याला तोंड देणं हे अजिबात सोपं नाही. मुख्यमंत्र्यांनी मी विनंती करते की त्यांनी याबाबत ठोस कारवाई करावी," अशी मागणी प्राजक्ता माळीने केली आहे.