टीसीपीच्या उदघाटनाला अमिताभ बच्चन?
By Admin | Updated: March 2, 2017 03:40 IST2017-03-02T03:40:10+5:302017-03-02T03:40:10+5:30
रेडिओ स्टेशन म्हणजेच टीसीपीचे उद्घाटन सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या हस्ते येत्या काही दिवसांतच होण्याची दाट शक्यता आहे

टीसीपीच्या उदघाटनाला अमिताभ बच्चन?
प्रज्ञा म्हात्रे,
ठाणे- बंदींच्या मनोरंजनासाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाने तयार केलेल्या रेडिओ स्टेशन म्हणजेच टीसीपीचे उद्घाटन सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या हस्ते येत्या काही दिवसांतच होण्याची दाट शक्यता आहे. बच्चन यांना बोलावण्यासाठी आता वरिष्ठ पातळीवरूनच प्रयत्न केले जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदींचे ज्ञानाबरोबर मनोरंजन व्हावे, त्यांचा वेळ चांगला जावा तसेच त्यांना चांगली गीते ऐकायला मिळावी, या उद्देशाने कारागृह प्रशासनाने वर्षभरापूर्वीच रेडिओ स्टेशन म्हणजेच टीसीपी तयार केले. परंतु, सेलिब्रेटीजच्या तारखा मिळत नसल्याने उद्घाटनच लांबणीवर पडले आहे. हे उद्घाटन बच्चन यांच्या हस्ते व्हावे, असा आग्रह याआधी कारागृह प्रशासनाने धरला होता. मात्र, त्यांची तारीख मिळत नसल्याने सुप्रसिद्ध सिनेअभिनेते आमीर खान यांना आमंत्रित करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात होता. परंतु, बच्चन यांच्यानंतर आमीर यांचीदेखील तारीख न मिळाल्याने टीसीपीच्या उद्घाटनाला मोठाच ब्रेक लागला. या टीसीपीच्या उद्घाटनाचा मुहूर्त कधी उजाडेल, असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झाला असताना हा मुहूर्त येत्या काही दिवसांतच मिळणार आहे. नामवंत कलाकारांच्याच हस्ते टीसीपीचे उद्घाटन व्हावे, असा आग्रह कारागृह प्रशासनाचा असल्याने ते त्या दृष्टीने प्रयत्नदेखील करीत आहेत. उद्घाटक म्हणून बच्चन यांच्या नावाची आता पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
या रेडिओ स्टेशनचे येत्या दोन आठवड्यांतच उद्घाटन व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
>बच्चन यांना बोलावण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत विचारता कारागृह अधीक्षक नितीन वायचळ म्हणाले की, नामवंत कलाकारांनाच उद्घाटनासाठी आमचा प्रयत्न असून या रेडिओ स्टेशनचे येत्या दोन आठवड्यांतच उद्घाटन केले जाईल.