अमिताभ-रजनीकांत भेटीने रसिक भारावले..!
By Admin | Updated: November 21, 2014 01:00 IST2014-11-21T00:48:11+5:302014-11-21T01:00:41+5:30
‘बॉस’चा ‘बिग ब्रदर’ला वाकून नमस्कार

अमिताभ-रजनीकांत भेटीने रसिक भारावले..!
संदीप आडनाईक-- पणजी : महानायक अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार रजनीकांत या चित्रपट क्षेत्रातील दोन दिग्गज कलाकारांची भेट गुरुवारी गोव्यात ४५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली.
सर्वप्रथम महानायक अमिताभ बच्चन यांनी महोत्सवात प्रवेश केला आणि सभागृहातील उपस्थित चाहत्यांनी प्रचंड जल्लोषात त्यांचे स्वागत केले. त्यानंतर थोड्याच वेळात दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांचे आगमन होताच त्यांच्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले.
रजनीकांत यांनी थेट अमिताभ यांच्याकडे जात त्यांना वाकून नमस्कार केला आणि अमिताभ यांनी मिठी मारत रजनीकांत यांचे स्वागत केले. दोघांनीही काही काळ संवाद साधला आणि ‘जॉन जॉनी जनार्दन’, ‘अंधा कानून’, ‘गिरफ्तार’ आणि ‘हम’ यासारख्या चित्रपटांतील भूमिकेच्या आठवणींना उजाळा दिला.
अमिताभ आणि रजनीकांत यांची पुन्हा भेट झाली ती रजनीकांत यांना पुरस्कार देतेवेळी व्यासपीठावर. पुरस्कारापूर्वी आपल्यावरील जीवनपट पाहून रजनीकांत यांना गहिवरून आले. त्यांच्या डोळ्यांच्या कडाही ओलावल्या. अभिनेत्री रविना टंडन यांनी रजनीकांत यांना चार शब्द सांगण्याची विनंती करताच त्यांनी मी इथे पुरस्कार स्वीकारायला आलो होतो. भाषण देण्याची तयारी नाही, असे सांगत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारताना खूपच आनंद होत आहे, असे सांगितले. अमिताभ यांच्याबद्दल बोलताना त्यांनी त्यांचा ‘बिग ब्रदर’ असा उल्लेख केला. अमिताभ यांनीही काहीही न बोलता दोघांमधले मैत्रीचे नाते अधिक दृढ केले. अमिताभ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, मानपत्र, तर अरुण जेटली यांच्या हस्ते शताब्दी पुरस्काराचा दहा लाख रुपयांचा धनादेश रजनीकांत यांना सुपूर्द करण्यात आला.