हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) नेत्यांमध्ये नेहमीच आरोप प्रत्यारोप होताना दिसतात आणि कोण अधिक हिंदुत्ववादी, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधत त्यांना थेट एका मंत्र्यालाच मंत्रिमंडळातून काढून टाकण्याचे आव्हान दिले आहे. ठाकरे म्हणाले, "तुमच्या मंत्रीमंडळात गौमांस खाणारे मंत्री आहेत. ते म्हणतात मी गौमांस खातो, कोण मला आडवतं बघतो. अमित शाह यांच्यात जर हिंमत असेल, तर त्यांनी त्यांना मंत्रीमंडळातून काढायला हवे," असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारपरिषदेत बोलत होते.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? -उद्धव ठाकरे म्हणाले, "अमित शाह आम्हाला हिंदूत्वावर प्रश्न विचारत आहेत. पण मला तुम्हा सर्वांच्या माध्यमातून अमित शाह यांना प्रश्न विचारायचा आहे की, तुमच्या मंत्रीमंडळात गौमांस खाणारे मंत्री आहेत. ते म्हणतात मी गौमांस खातो, कोण मला आडवतं बघतो."
हिंमत असेल तर... -यावेळी, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत एक फोटोही दाखवला. हा फोटो दाखवत ते म्हणाले, "हा एक ९ डिसेंबरचा फोटो आहे. यात, ते जे मंत्री आहे, 'मी गौमांस खातो, कोण मला आडवतं?' म्हणणारे त्यंचे नाव आहे किरेन रिजिजू. आता अमित शाह त्यांच्यासोबत जेवण करत आहेत, त्यांच्या थाळीत आणि यांच्या थाळीत काय आहे? मला माहीत नाही, पण, अमित शाह यांच्यात जर हिंमत असेल, माझ्या हिंदूत्वार त्यांना शंका घ्यायची असेल, तर त्यांनी रिजिजूंना मंत्रीमंडळातून काढायला हवे." एवढेच नाही तर, "रिजिजू गौ-मांस खातात, असं ते स्वतःच बोललेले आहेत," असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
"प्राचीन मंदिर पाडून RSSचं कार्यालय बांधलं!" -गेल्या काही दिवसांत दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयासाठी प्राचीन मंदिर पाडले गेले. मी या मुद्द्यावर काही भाष्य केले नव्हते. अमित शाह यांना विचारचे आहे की, मंदिर पाडून तुम्ही संघाचे कार्यालय उभारले. त्याही पलीकडे जाऊन सांगतो की, मी मुख्यमंत्री असताना पालघर येथील साधू हत्याकांड या प्रकरणावरून आकाश-पाताळ एक केले होते. त्याच प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीला भाजपात घेताना तुमचे हिंदुत्व काय मेले होते? अमित शाह यांना लाज वाटली पाहिजे की, त्यांनी माझ्या हिंदुत्वावर टीका करताना त्यांच्या बुडाखाली जे हिंदुत्व आहे ते आधी पाहिले पाहिजे," असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शाह यांच्यावर वार केला.