टेरिफ वॉर अमेरिकेचे, कोकणातल्या मच्छीमारांना फटका बसला, तो कसा काय? तुम्हाला हे कनेक्शन माहितीच नसेल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 17:16 IST2025-04-11T17:16:11+5:302025-04-11T17:16:44+5:30
जगात कुठेही काही घडले की त्यावर जोरदार चर्चा करत मत मांडण्याचा हक्क कोकणी माणसाचा असे कधीकाळी म्हटले जात असे. मग यात कोकण कसे मागे राहिल.

टेरिफ वॉर अमेरिकेचे, कोकणातल्या मच्छीमारांना फटका बसला, तो कसा काय? तुम्हाला हे कनेक्शन माहितीच नसेल...
अमेरिकेच्या टेरिफ व़ॉरमुळे चीनसह इतर देश दहशतीत असताना आता कोकणातील मच्छीमारही धास्तावलेले आहेत. जगात कुठेही काही घडले की त्यावर जोरदार चर्चा करत मत मांडण्याचा हक्क कोकणी माणसाचा असे कधीकाळी म्हटले जात असे. मग यात कोकण कसे मागे राहिल. अमेरिकेने टेरिफ वॉ़र सुरु केले आणि कोकणातील मच्छीमारांना याचा फटका बसलेला आहे.
झालेय असे की, कोकणात मिळणारी कोळंबी अमेरिकेत जाते. टॅरिफ धोरणामुळे कोळंबीवर २६ टक्के शुल्क भरावे लागणार आहे. यामुळे कोळंबीची मागणी घटली असून ही कोळंबी मच्छीमारांना स्थानिक बाजारात विकावी लागत आहे. यामुळे या कोळंबीचे किलोमागे दर २५० रुपयांवरून थेट ७० रुपये झाले आहेत.
वन्नामेई नावाच्या कोळंबीला अमेरिकेत सर्वाधिक मागणी आहे. कोकण पट्ट्यात ही मासळी मिळते. एका किलोमध्ये ५० नग असतात. ती मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. आता अमेरिकेने निर्यात शुल्क लावल्याने अमेरिकेतील ग्राहकांना ती महाग होणार आहे. जादा दराने खरेदी करावी लागणार असल्याने या कोळंबीची मागणी कमी होणार आहे. यामुळे एक्स्पोर्टरनी कमी मागणी नोंदविल्याने या मच्छीचे दर गडगडले आहेत, असे सुलतान वस्ता या मच्छीमाराने सांगितले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर टॅरिफला ३ महिन्यांची स्थगिती देत जगभरातील अनेक देशांना दिलासा दिला. मात्र, यात चीनवर आपला राग कायम ठेवला आहे. ट्रम्प यांनी आधी लादलेल्या टॅरिफला चीनने जशास तसे दिलेले उत्तर अमेरिकेच्या जिव्हारी लागले. त्यानंतर अमेरिकेने बीजिंगमधून आयात होणाऱ्या वस्तूंवरील शुल्क १०४ टक्क्यांवरून १२५ टक्के करत सर्वांनाच धक्का दिला होता, याला प्रत्यूत्तर म्हणून चीननेही अमेरिकेच्या मालावर १२५ टक्के निर्यात शुल्क आकारले आहे. अमेरिकेसमोर झुकणार नाही, अशीच भूमिका सध्यातरी चीनची आहे. सध्या जगातील २ महासत्ता देशांमधील व्यापारी तणाव वाढत आहे. याचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थांवरही होत आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाविरुद्ध जागतिक व्यापार संघटनेकडे (डब्ल्यूटीओ) आपला निषेध नोंदवल्याचे चीनने म्हटले आहे.