...सदा ते देतजी जावे, जगाला प्रेम अर्पावे!

By Admin | Updated: May 7, 2017 04:11 IST2017-05-07T04:10:37+5:302017-05-07T04:11:45+5:30

साधारणत: पंधरा-सतरा वर्षांपूर्वीची गोष्ट. हेमलकसाच्या किर्र जंगलात वीज नसलेल्या एका अंधाऱ्या रात्री एक भलती चर्चा

... always be offered, give love to the world! | ...सदा ते देतजी जावे, जगाला प्रेम अर्पावे!

...सदा ते देतजी जावे, जगाला प्रेम अर्पावे!

अपर्णा वेलणकर/  लोकमत न्यूज नेटवर्क

हे सारे घडवणारा हा माणूस १९६७ पासून म्हणजे वयाची तब्बल पन्नास वर्षे कॅनडात राहिला, तरीही त्याच्या मना-विचारावर पश्चिमेची कोरडी, व्यवहारी, स्मार्ट घडी चढली नाही. डॉ. वाणींचा स्वभाव अत्यंत मधाळ आणि त्यांचे हसणे अतीव प्रसन्न होते... साने गुरुजींच्या लाडक्या मुलांसारखे! कधीकधी ते पाहात ती ‘स्वप्ने’ भाबडी असत, त्यांना भेटणारी काही माणसे ‘दिसत’ तशी ‘नसत’, क्लेश होत, प्रयत्नांवर अनपेक्षित पाणी पडे; असे झाले की ते म्हणत, ‘‘जाऊ दे, आपण आपले काम करावे!’’


साधारणत: पंधरा-सतरा वर्षांपूर्वीची गोष्ट.  हेमलकसाच्या किर्र जंगलात वीज नसलेल्या एका अंधाऱ्या रात्री एक भलती चर्चा चालू होती. डॉ. प्रकाश आमटे यांच्यासमोर आपला लुकलुकता लॅपटॉप उघडून बसलेली, ‘परदेशस्थ भारतीय’ देणगीदार संस्थेची अध्यक्ष असलेली व्यक्ती विचारत होती, ‘बोल प्रकाश, कसे लिहायचे प्रपोजल? तुझ्या कामाला एकूण किती रकमेची, कशाकशाची गरज आहे?’
डॉ. आमटे अवघडून सांगत होते, ‘काही नको काका, आहे हे पुष्कळ आहे की!’
‘पण मग तुझे काम कसे पुढे जाणार? पैसे कुठून येणार?’
- या असल्या आग्रहाची सवय नसलेले डॉ. आमटे सांगत राहिले, होईल काहीतरी व्यवस्था. कामाची गरज असेल, तोवर चालेलच ते. गरज संपली की थांबेल. त्यात काय?
- पण सामाजिक काम कितीही निरपेक्ष असले, तरी याही कामाला शिस्त हवी, नियोजन हवे, पैसा हवा कारण हे काम जिवंत राहायला हवे, पैसा उभा करायचा तर त्यासाठी प्रयत्न हवेत आणि या प्रयत्नांना दिशा हवी; हे त्या व्यक्तीने हर प्रयत्ने डॉ. आमटे यांच्या गळी उतरवले.. एवढेच नव्हे; तर लोकबिरादरीचे काम अखंड चालू राहावे म्हणून भक्कम आर्थिक बैठक कशी तयार करता येईल हे तपासून पाहिले, अपेक्षित आराखडे आखले, आवश्यक निधीची गणिते जुळवली, त्यासाठी स्वत:च एक ‘प्रपोजल’ लिहिले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या प्रपोजलची प्रत डॉ. आमटे यांच्यासमोर ठेऊन सांगितले, ‘आता कर सही!’
- परदेशी देणगीदारांना गळाला लावण्यासाठी ‘रेडीमेड प्रपोजल्स’चे कारखाने चालवण्याच्या आजच्या (आणि ‘त्या’ही) काळात अशक्य वाटावा असा हा प्रसंग! डॉ. आमटे यांना परदेशी देणगी स्वीकारण्यासाठी राजी करणारे ते गृहस्थ म्हणजे डॉ. जगन्नाथ वाणी!
- ‘घेण्या’ची कणभर आसक्ती नसलेल्यांना शोधत शोधत महाराष्ट्रभर भटकत फिरणारा, ‘देण्या’ची विलक्षण तळमळ असलेला माणूस!
हेमलकसाच्या जंगलाबाहेरचे जग न पाहिलेल्या प्रकाश आमटे यांना थेट न्यूयॉर्कच्या मेडिसन स्क्वेअर गार्डनच्या झळकत्या व्यासपीठावर जायला डॉ. वाणी यांनी राजी केले, ते २००३ च्या बृहन्महाराष्ट्र अधिवेशनासाठी!
‘अमेरिकेत प्रकाश अर्धी चड्डी आणि बंडी ऐवजी किमान कुर्तातरी घालेल का आणि मुख्य म्हणजे बोलेल का?’- या अवघड प्रश्नाच्या उत्तरांच्या शक्यता शोधण्याची जबाबदारी डॉ. वाणींनी माझ्यावर टाकली, तेव्हापासून मी त्यांच्या मोठ्या टीमचा भाग बनून गेले... असे माझ्यासारखे कितीतरी छोटेछोटे दुवे जोडत डॉ. वाणींनी महाराष्ट्रातील सामाजिक कामांना बळ पुरवणारी एक जागतिक साखळीच तयार केली होती.
- ज्याला जे येते, ते त्याने करायचे असे साधे सूत्र घेऊन वर्षातून किमान दोनतीनदा तरी डॉ. वाणी कॅनडाहून भारतात येत, आणि एक मोटार घेऊन महाराष्ट्रात भिंगरी लागल्यासारखे भिरीभिरी फिरत. हरेक दौऱ्यात त्यांना पाच-पन्नास नवी माणसे मिळतच. समाजात काही बदल घडावा याची आंतरिक तळमळ असलेली ही माणसे. त्यांना एकमेकांशी जोडून दिले, की हे चालले परत कॅनडाला! मग यांनी त्यांचे हिशेब ठेवायला मदत करायची, त्यांनी ह्यांचे एफ.सी.आर.ए.चे काम व्हावे म्हणून दिल्लीत हेलपाटे मारायचे, याने नसीमासाठी स्क्रीप्ट लिहायचे आणि त्याने नीलिमाचे प्रश्न सोडवायचे अशा जोड्या जुळत. जाताना डॉ. वाणींच्या पुराण्या लॅपटॉपमध्ये नव्या संस्था, त्यांचे काम, त्यांना कशी/किती मदत देता येईल त्याचे आराखडे अशी सगळी जंत्री भरलेली असे! तिकडे गेले, की मग ‘इकडच्यां’ना फोन सुरू!! अगदी शिस्तीच्या माणसालाही हरवील असा नेमकेपणा आणि ‘समाजसेवक’ म्हणवणाऱ्यांना लाजवील अशी वेडी तळमळ. महाराष्ट्रातले प्रत्येक चांगले काम आपल्याला कळलेच पाहिजे, आपण प्रत्यक्ष जाऊन ते पाहिलेच पाहिजे आणि काम खरेच बावनकशी असेल तर वाट्टेल ते झाले तरी त्याला आर्थिक मदत मिळालीच पाहिजे; एवढ्या त्रिसूत्रीवर डॉ. वाणींनी आपले निवृत्तीनंतरचे जीवन अक्षरश: उधळून दिले.
हे काम वेडे होते. वेडेच होते...पण ते करण्यामागे एका जातीवंत गणितज्ज्ञाचा नेमकेपणा आणि अकटोविकटीची शिस्त असे. उत्तर अमेरिकेतल्या मराठी माणसांच्या खिशात हात घालून देणग्या मिळवणे हे मुळात कठीण! पण डॉ. वाणी ते सहज करीत. त्यानंतर मिळालेल्या देणगीच्या रकमेत कॅनडा सरकारकडून ‘मॅचिंग ग्रॅण्ट्स’ मिळवणे हे त्याहून कठीण. त्यासाठी प्रदीर्घ प्रस्ताव-लेखन, त्याचा पाठपुरावा, नंतर कॅनडाचे अधिकारी येऊन प्रत्यक्ष करीत ते आॅडिट अशी मोठी सर्कस चालवावी लागे... त्यात डॉ. वाणींचा हातखंडा होता. या मार्गाने उत्तर अमेरिकेतल्या मराठी माणसांनी दिलेला एक डॉलर महाराष्ट्रात पोचेपर्यंत त्याचे सहा ते सात डॉलर्स होत. अशा देशा-परदेशातल्या देणगी-व्यवहारांमध्ये आलेल्या पैशाला जाताना ‘गळती’ लागते हे झाले एरवीचे. डॉ. वाणींचा व्यवहार उफराटा होता. ते जगभरातून मिळवत त्या देणग्या किमान सहा ते सात पटीने वाढून मगच महाराष्ट्रात येत.
- महाराष्ट्र सेवा समितीच्या माध्यमातून हे सारे त्यांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत- म्हणजे किमान तिसेक वर्षे निष्ठेने केले. त्यातून माणसे उभी राहिली. संस्था उभ्या झाल्या. कानाकोपऱ्यात चालणाऱ्या कामांना हक्काचे छप्पर मिळाले. डॉ. प्रकाश आमटे, नीलिमा मिश्रा यांच्यासारखी एकेकटी काम करणारी वेडी माणसे जगासमोर आली. ‘देवराई’, ‘एक कप च्या’, ‘प्रकाशवाटा’सारख्या कलाकृती घडल्या.
... आणि मुख्य म्हणजे आपल्या जन्मभूमीचे ॠण फेडण्याची प्रत्यक्ष अनुभवातून सिध्द होत गेलेली एक ‘रीत’ घडली. डॉ. वाणींच्या स्वभावात रुजून असलेले हे ‘मूल’ मोठे हट्टी पण लोभस होते.
- लहानपणी मिळालेले राष्ट्रसेवादलाचे संस्कार या माणसाला आयुष्यभर पुरून उरले. या संस्कारांमध्ये स्वत:च्या व्यक्तिगत दु:खाचे एवढेही मळभ सार्वजनिक कामावर येऊ न देण्याची युक्ती होती, ढासळत्या समाजवास्तवाच्या धक्क्यांनी तसूभरही न ढळणारा चिवट आशावाद होता आणि आपुल्या जातीचा जो जो कुणी भेटेल त्याला आपल्या माळेत ओवत नेणारे एक निर्भर हसरे वेड होते!!!
- ते वेड आता संपले...

Web Title: ... always be offered, give love to the world!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.