जागा वाटप नव्या फॉर्म्युल्यानुसार
By Admin | Updated: July 15, 2014 03:10 IST2014-07-15T03:10:36+5:302014-07-15T03:10:36+5:30
महायुतीत नेतृत्वाबाबत कुठलाही वाद नाही. आगामी विधानसभा निवडणूक महायुती ही एकत्रितपणे आणि एकदिलाने लढणार आहे.

जागा वाटप नव्या फॉर्म्युल्यानुसार
नागपूर : महायुतीत नेतृत्वाबाबत कुठलाही वाद नाही. आगामी विधानसभा निवडणूक महायुती ही एकत्रितपणे आणि एकदिलाने लढणार आहे. परंतु महायुतीमध्ये आता रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी नवीन पक्ष सहभागी झाल्याने त्यांनाही काही जागा सोडाव्या लागणार आहेत. त्यामुळे जुन्या पद्धतीने जागा वाटप आता शक्य नाही. त्यामुळे यंदा नवीन फॉर्म्युल्यानेच महायुतीतील जागा वाटप होईल, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत स्पष्ट केले.
रविभवन येथे भाजपा प्रदेश कोर कमिटीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. तावडे म्हणाले, गेल्या १५ वर्षात महाराष्ट्र इतका मागे गेला. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस-राकाँचा पराभव कुणीही थांबवू शकणार नाही. आमच्या नेत्याने मुख्यमंत्री व्हावे, हा वाद नव्हे तर कार्यकर्त्यांची असलेली ती इच्छा स्वाभाविक आहे. परंतु महायुतीची याबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही. येत्या २० जुलैपासून जागा वाटपाबाबत चर्चा केली जाईल. सर्वप्रथम रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम या घटक पक्षाच्या जागांवर चर्चा केली जाईल. १५ आॅगस्टपर्यंत महायुती उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)