नाशिकमधील शेतात केले पैशांचे वाटप
By Admin | Updated: July 2, 2016 04:25 IST2016-07-02T04:25:27+5:302016-07-02T04:25:27+5:30
नऊ कोटी १६ लाखांच्या रकमेचे नाशिकमधील एका शेतात ६० आणि ४० टक्क्यांच्या फॉर्मुल्याने काही तासांतच वाटप झाले.

नाशिकमधील शेतात केले पैशांचे वाटप
पंकज रोडेकर,
ठाणे- चेकमेट कंपनीत लुटलेल्या नऊ कोटी १६ लाखांच्या रकमेचे नाशिकमधील एका शेतात ६० आणि ४० टक्क्यांच्या फॉर्मुल्याने काही तासांतच वाटप झाले. प्रत्येकाला पैसे गोणीत भरून देण्यात आले आणि त्यासाठी १७ गोण्यांचा वापर केला गेल्याचे तपासात आढळून आले. पैसेवाटप झालेल्या शेतातच एक कोटी आठ लाखांची रोकड सापडली. आणखी एका फरार आरोपीच्या घरात एक कोटी ९५ लाख रुपये सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली. कंपनीतील आजी-माजी कर्मचारी, नाशिकमधील काही जणांची मदत घेत १५ जणांनी ठाण्यात २८ जूनला हा दरोडा टाकला.
दरोडेखोरांनी ड्रमसह कचऱ्याच्या पेट्यांत रक्कम भरून नेली होती. नाशिकजवळ पोहोचल्यावर त्यांनी लगेचच तिचे वाटप केले. वाडिवरे गावात राहणाऱ्या व सध्या फरार असलेल्या आरोपीच्या शेतात ते आधी पोहोचले. तेथे रकमेचे वाटप करताना त्यांनी आधी ठरवल्यानुसार ६० आणि ४० टक्क्यांचा फॉर्म्युला वापरल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानुसार, वाहनचालकांना ४० टक्के, तर ज्यांनी प्रत्यक्ष दरोडा टाकला, त्यांना ६० टक्के अशी रक्कम वाटली गेली.
चेकमेट कंपनीत यापूर्वी दोन वेळा दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या, त्यात साहाय्य करणाऱ्यांनाही या रकमेचा काही वाटा देण्याचे ठरले होते. त्यांनी तोंड उघडू नये, कोणताही पुरावा त्यांच्याकडून मिळू नये, यासाठी त्यांनाही या रकमेतील काही वाटा दिला जाणार असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. दरोड्याची रक्कम ड्रम आणि कचरापेट्यांतून आणली असली, तरी वाटप करताना संशय नको म्हणून हे पैसे प्रत्येकाला गोण्यांमध्ये भरून देण्यात आले. यासाठी १७ गोण्यांचा वापर करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
अटक केलेल्यांतील नितेश आव्हाड, मयूर कदम यांच्याकडे प्रत्येकी ४० लाख, तर उमेश वाघ याच्याकडे ६० लाखांची रोकड सापडली. उरलेल्या तिघांकडे रक्कम सापडलेली नाही.
>मोबाइलचे लोकेशन्स मानकोली
दरोडा टाकल्यानंतर दरोडेखोरांनी तेथून पाच मोबाइल फोनही चोरले होते. त्यातील एका मोबाइलचे लोकेशन्स मानकोली येथे दाखवले होते. त्यानुसार, अंदाज बांधून दरोडेखोर नाशिकला गेले असल्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाचा मोर्चा नाशिककडे वळवला होता. तो अंदाज खरा ठरला.
आणखी नऊ जण?
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, दरोड्यात आणखी किमान नऊ जणांचा सहभाग असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यातील चौघांची नावे स्पष्ट झाली आहेत. उरलेल्यांची नावेही लवकरच तपासात समोर येतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.
नाशकात सात-आठ पथके तैनात
या गुन्ह्यातील चार जण गोवा आणि तिरुपतीला गेले असल्याची माहिती समजल्याने तेथे पथके रवाना झाली आहेत. तसेच दरोड्याचे नाशिक कनेक्शन लक्षात घेऊन तेथे सात-आठ पथके अद्यापही तैनात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पत्रकार परिषदेवेळीच सापडली रोकड
ठाण्यात पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत दरोड्याची उकल झाल्याची माहिती दिली जात असतानाच पैसे वाटप झालेल्या शेतातच एक कोटी आठ लाखांची रक्कम सापडल्याची माहिती हाती आली. ती वगळता बाकीची रक्कम आधीच हस्तगत करण्यात आली होती.