मित्रपक्षांच्या नेत्यांच ठरलं, महायुतीत हव्यात ४६ जागा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 15:01 IST2019-08-03T14:54:43+5:302019-08-03T15:01:13+5:30
महायुतीच्या मित्रपक्षांनी अव्वाच्या सव्वा जागा मागितल्याने सेने-भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

मित्रपक्षांच्या नेत्यांच ठरलं, महायुतीत हव्यात ४६ जागा
मुंबई – भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांची युती अभेद्य आहे. लोकसभेप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकाही युती म्हणूनच लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्याने विधानसभा निवडणुकीत महायुती होणारे असल्याचे निश्चित समजले जात आहे. मात्र महायुतीच्या मित्रपक्षांनी अव्वाच्या सव्वा जागा मागितल्याने सेने-भाजपची डोकेदुखी वाढली आहे. आगामी निवडणुकीत मित्रपक्षांच्या नेत्यांनी एकूण ४६ जागा मागितल्या आहे. त्यामुळे सेना-भाजप समोर पेच निर्माण झाले आहे.
शिवसंग्राम पक्षाचे नेते व आमदार विनायक मेटे यांनी अकोला येथे झालेल्या पत्रकार परिषेदेत महायुतीच्या १२ जागांवर दावा केला आहे. दुसरीकडे रासपचे अध्यक्ष व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी सुद्धा किमान १२ जागा आम्हाला मिळतील असा दावा केला आहे. त्यातच, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या रिपब्लिकन पक्षाला महायुतीत १० जागा मिळाव्यात अशी मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर महायुतीमध्ये सामील कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयतक्रांती संघटनेने विधानसभा निवडणुकीसाठी १२ जागांची मागणी केली आहे. मित्रपक्षांच्या नेत्यांनी एकूण ४६ जागांची मागणी केली आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र असे असले तरीही, जागावाटपाचा फार्म्युला अजूनही ठरला नाही. सेना- भाजपच्या जागावाटपाचा निर्णय झाल्यानंतर उरलेल्या जागा मित्रपक्ष यांना दिले जाणार आहेत. मात्र त्याआधीच महायुतीच्या मित्रपक्षांनी अव्वाच्या सव्वा जागा मागितल्या असल्याचे पहायला मिळाले आहे. त्यामुळे मित्रपक्षांच्या पारड्यात किती जागा पडणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.