मुंबईच्या महापौरांवर लाचखोरीचा आरोप

By Admin | Updated: March 30, 2015 13:35 IST2015-03-30T13:03:24+5:302015-03-30T13:35:18+5:30

महापौर स्नेहल आंबेकर यांनी ठेकेदार व स्थानिक नगरसेवकांकडून टक्केवारी घेऊन निधी वाटप केल्याची तक्रार एसीबीकडे मनसेने केली आहे.

The allegations of bribery on the Mayor of Mumbai | मुंबईच्या महापौरांवर लाचखोरीचा आरोप

मुंबईच्या महापौरांवर लाचखोरीचा आरोप

 शेफाली परब

मुंबईच्या महापौर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चौकशीच्या जाळ्य़ात अडकण्याची शक्यता आहे. विकासकामांसाठी राखीव निधीचा मोठा वाटा शिवसेनेने लाटल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू आहे. मात्र महापौर स्नेहल आंबेकर यांनीच ठेकेदार व स्थानिक नगरसेवकांकडून टक्केवारी घेऊन निधी वाटप केल्याची तक्रार एसीबीकडे करीत मनसेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली. 
२0१५-२0१६च्या कर वाढविणार्‍या या अर्थसंकल्पावर टीकेची झोड उठल्यानंतर चारशे कोटींचा वाढीव निधी विकासकामांसाठी राखून ठेवण्यात आला. परंतु जिसकी लाठी उसकी भैस या म्हणीनुसार पालिकेतील बलाढय़ नगरसेवकांच्या प्रभागांकडे या निधीची गंगा वाहिली. खरोखरच या निधीची गरज असलेले प्रभाग मात्र विकासकामांपासून वंचित राहिले. या असमान निधी वाटपाबाबत विरोधी पक्षातच नव्हे तर शिवसेनेच्या गोटातही असंतोष निर्माण झाला. 
याबाबत पालिका महासभेत जाब विचारणार्‍या काँग्रेस नगरसेविकांनाच निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. निलंबित नगरसेवकांनी आपल्या दालनात येऊनच माफी मागावी, असं आडमुठीचं धोरण अवलंबत पालिकेच्या सहा महासभांचा महापौरांनी खेळखंडोबा केला. महापौर नियुक्तीनंतर स्नेहल आंबेकर यांच्या कार्यप्रणाली तसेच कार्यक्षमतेबद्दल राजकीय वतरुळात भुवया उंचाविल्या गेल्या होत्या. मुळातच पहिल्यांदाच नगरसेविका या पदावर निवडून आलेल्या आंबेकर यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडताच त्यांचा एकंदर राजकीय अनुभव-अभ्यास लक्षात घेता त्या या पदाची प्रतिष्ठा टिकवू शकतील का? याबाबत साशंकता निर्माण झाली होती.
महापौरपदाची धुरा सांभाळताच लाल दिव्याच्या गाडीचा हट्ट धरीत आंबेकर यांनी लोकप्रतिनिधींच्या संशयाला पुष्टी दिली. तद्नंतर डेंग्यू व स्वाइन फ्लूबाबत वादग्रस्त विधाने करीत त्यांनी अकलेचे तारे तोडले होते. हास्यास्पद विधाने करणार्‍या या महापौरांचे नाव आता करोडो रुपयांच्या भ्रष्टाचारामध्ये गोवले जात आहे. पालिकेतील कथित टक्केवारीचा व्यवहार यापूर्वीही अनेकवेळा चर्चेत आला आहे. परंतु या टक्केवारीत तथ्य किती हे कधी कोणी उजेडात आणण्याचे धाडस केले नाही. ठेकेदार महापालिका चालवितात, असेही अनेकवेळा दिसून आले आहे. अनेक प्रकल्पात ठेकेदार म्हणेल ती पूर्वदिशा ठरली आहे. यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत, मात्र मुंबईच्या प्रथम नागरिकाकडे बोट दाखविण्याची हिंमत तसेच त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची पालिकेच्या इतिहासात कदाचित ही पहिलीच वेळ आहे

Web Title: The allegations of bribery on the Mayor of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.