अकोला ठरले ’जगातील सर्वाधिक उष्ण शहर’; पारा ४४.२ अंशांव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2022 20:53 IST2022-04-05T20:52:29+5:302022-04-05T20:53:52+5:30
Akola Mercury 44.2 degrees : कमाल तापमान ४४.२ अंश सेल्सियस कमाल तापमानासह मंगळवारी अकोला जगातील सर्वांत उष्ण शहर ठरले.

अकोला ठरले ’जगातील सर्वाधिक उष्ण शहर’; पारा ४४.२ अंशांव
अकोला : गत काही दिवसांपासून सुरु असलेली उष्णतेची लाट कायमच असून, सूर्य प्रखरतेने तळपत असल्याने मंगळवारी (दि. ५ एप्रिल) जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात करण्यात आली. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनुसार, कमाल तापमान ४४.२ अंश सेल्सियस कमाल तापमानासह मंगळवारी अकोला जगातील सर्वांत उष्ण शहर ठरले. नायझर देशातील बिर्नी एन कोन्नी (४४ अंश सेल्सियस) दुसरे सर्वाधिक उष्ण ठिकाण आहे. टॉप पाच शहरांमध्ये पाकिस्तानमधील नवाबशाह व नायझर देशातील एनगुल्ग्मी व टिलाबेरी या शहरांचा समावेश आहे.
मार्च महिन्याच्या उत्तरार्धापासून सुरू असलेली उष्णतेची लाट एप्रिल महिन्यात आणखीन तीव्र झाली आहे. गत आठवडाभरापासून अकोला शहराचे तापमान ४३ अंशांच्या वरच राहिले आहे. रविवारी पहिल्यांदाच पारा ४४ अंशांवर गेला. पुढील दोन दिवसांत यामध्ये वाढ होऊन मंगळवारी ४४.२ अंश सेल्सियश तापमानाची नोंद झाली. उन्हाचा कडाका वाढल्याने शहरातील रस्ते भरदुपारी निर्मनुष्य होत आहेत. उन्हापासून बचाव म्हणून नागरिक रूमाल, स्कार्फ, दुपट्ट्यांचा वापर करत आहेत. अंगाची लाही-लाही होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तप्त झळा असह्य होत असल्याने नागरिक घरातच राहणे पसंत करत आहेत.