मुंबई/सोलापूर: अवैध मुरूम उत्खननाविरोधात कारवाईसाठी गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा उपविभागाच्या सहायक पोलिस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही. एस. यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून साधलेला संवाद गुरुवारी रात्री व्हायरल झाला. 'दादागिरी' विरोधात टीकेची चौफेर झोड उठल्याने अजित पवार यांनी अखेर शुक्रवारी खुलासा करीत घडल्या गोष्टीवर पांघरूण घातले.
सोलापूर जिल्ह्यातील कुई गावात अवैध मुरूम उत्खननाविरोधात कारवाईसाठी अंजना कृष्णा गेल्या होत्या. त्यावेळी एका कार्यकर्त्याने अजित पवार यांना कॉल लावून इकडे बोला असे म्हणत मोबाइल अंजली कृष्णा यांच्या हातात दिला. "मैं डीसीएम अजित पवार बोल रहा हू. कारवाई बंद करो, मेरा आदेश है" असे म्हटल्यावर अंजना कृष्णा यांनी 'मेरे फोन पर कॉल करो' असे उत्तर दिल्यावर संतापत अजित पवार यांनी 'तुम पे अॅक्शन लूंगा, इतनी डेअरिंग है तुम्हारी', असे म्हटले होते.
बेकायदा कामावर कारवाई थांबवल्यावर कायद्याची भाषा कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा आपला उद्देश नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलिस दलाबद्दल, तसेच धैर्याने आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचे राज्य हेच सर्वांत महत्त्वाचे आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे.
आ. अमोल मिटकरी यांचे यूपीएससीला पत्रअजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आयपीएस अंजना कृष्णा यांची शैक्षणिक आणि जात प्रमाणपत्राची तपासणी करावी, अशी मागणी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे केली आहे. अंजना कृष्णा यांच्या कागदपत्रांबाबत संशय व्यक्त करण्यात येत असून, आयोगाच्या स्तरावर कागदपत्रांची सखोल तपासणी करून संबंधितांना अवगत करण्यात यावे, असे मिटकरी यांनी आयोगाला पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अंजना कृष्णा यांची चौकशी कशासाठी, कार्यकर्त्यांच्या बेकायदेशीर उत्खननावर कारवाई केली म्हणून का, असा प्रश्न केला आहे.
सरकारी कामात अडथळा २० जणांविरुद्ध गुन्हासरकारी कामात अडथळा निर्माण करीत बेकायदेशीर जमाव जमवून गोंधळ घातल्या प्रकरणात माढा तालुक्यातील कुई येथील २० जणांविरुद्ध कुडूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेड कॉन्स्टेबल नितीन श्रीपती गोरे यांनी फिर्याद दिली आहे.