- दीपक भातुसेमुंबई - अजित पवार यांच्या जागी त्यांच्या पत्नी खा. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे, असा आग्रह राष्ट्रवादीतील नेते, मंत्री, आमदार करत आहेत. आधी अजित पवारांच्या जागी विधिमंडळ पक्षाचा नवा नेता निवडण्यासाठी दोन-तीन दिवसांत पक्षाच्या आमदारांची बैठक होईल. पक्षाचे बहुसंख्य मंत्री आणि आमदार सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी असल्याने बैठकीतही विधिमंडळ पक्षनेतेपद आणि उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याबाबत सुनेत्रा पवार यांच्या नावाचाच आग्रह होईल, तसेच त्यांची एकमताने निवड होण्याची शक्यता असल्याचे पक्षातील एका नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले.
अन्न, औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी सुनेत्रा पवार यांना मंत्रिमंडळात घ्यायलाच हवे, अशी भूमिका मांडली आहे. परंतु त्यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला तर काय, असा प्रश्नही नेत्यांपुढे आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्रिपदासाठी पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांच्या नावाची दबक्या आवाजात चर्चा आहे. आमदारांची मते जाणून घेऊनच निर्णय घ्यावेत आणि आमची भावना तर सुनेत्रा पवार यांनीच पद स्वीकारावे, अशी असल्याचे पक्षातील एका आमदाराने सांगितले.
अध्यक्षपदासाठीही नावांची चर्चाअजित पवार यांच्या जागी पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाकडे जाईल याबाबत वेगवेगळी नावे चर्चेत असली तरी सुनेत्रा पवार यांचेच नाव आघाडीवर आहे. त्यानंतर खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ यांची नावे घेतली जातात. मात्र ठाम कुणी काही सांगत नाही.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालीदोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबतच्या हालचाली नव्याने सुरू झाल्या आहेत. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की, आता सत्य बोलणे गरजेचे आहे. महापालिका निवडणुकीनंतर एकत्र येऊ, असे अजित पवार म्हणाले होते. त्या अनुषंगाने बैठकाही झाल्या. आता त्यादृष्टीनेच आमची वाटचाल होईल.
मुख्यमंत्री सादर करणार अर्थसंकल्प?यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच सादर करतील, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच राष्ट्रवादीतही वित्त व नियोजन खाते भाजपने घ्यावे, अशी चर्चा सुरू आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी १२ वाजून ८ मिनिटांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ व जय पवार यांनी मुखाग्नी दिला. ज्येष्ठ नेते शरद पवार, खा. सुनेत्रा पवार, खा. सुप्रिया पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. लाखो कार्यकर्ते आणि बारामतीकरांनी अश्रू ढाळत लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशभरातील विविध नेते आणि मंत्रिमंडळातील सहकारी खासदार, आमदारांसह मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले.
Web Summary : NCP leaders favor Sunetra Pawar for Deputy Chief Minister, succeeding Ajit Pawar. Party meeting will decide. Discussion includes national president post candidates and potential reconciliation with Sharad Pawar's group. Concerns arise about budget presentation and Ajit Pawar's funeral.
Web Summary : अजित पवार के बाद सुनेत्रा पवार को उपमुख्यमंत्री बनाने के पक्ष में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता। पार्टी बैठक में होगा फैसला। राष्ट्रीय अध्यक्ष पद के उम्मीदवारों और शरद पवार गुट के साथ संभावित सुलह पर भी चर्चा। बजट प्रस्तुति और अजित पवार के अंतिम संस्कार को लेकर चिंताएँ।