Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात षडयंत्र? पुत्रासह नातेवाइकांची कार्यालये, निवासस्थानी छापे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 06:16 AM2021-10-08T06:16:13+5:302021-10-08T06:18:45+5:30

IT Raid on Ajit Pawar Relative: अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयावर छापा टाकला. तेथील दस्तऐवज व इलेक्ट्रॉनिक गॅझेट ताब्यात घेऊन त्याची तपासणी करण्यात येत आहे

Ajit Pawar: Conspiracy against DCM Ajit Pawar? Offices of relatives with son, IT raids at residence | Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात षडयंत्र? पुत्रासह नातेवाइकांची कार्यालये, निवासस्थानी छापे

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात षडयंत्र? पुत्रासह नातेवाइकांची कार्यालये, निवासस्थानी छापे

Next
ठळक मुद्देदाैंड तालुक्यातील आलेगाव पागा येथील दौंड शुगर कारखाना, एमआयडीसीतील एका डेअरी कंपनीवरही छापा टाकलाकाही दिवसांपूर्वी राज्यातील ६०हून अधिक सहकारी साखर कारखान्यांना प्राप्तिकर खात्याने नोटिसा बजावल्या आहेतया कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या निर्धारित दरापेक्षा ऊस खरेदीसाठी दिलेली अधिकची रक्कम कारखान्याचा नफा आहे

मुंबई : करचोरी विरोधातील प्राप्तिकर विभागाची गुरुवारी सकाळी सुरू झालेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संंबंधित कंपन्या, त्यांचे पुत्र पार्थ पवार यांचे मुंबईतील कार्यालय आणि अजित पवार यांच्या तीन भगिनींच्या घर व कार्यालयांवर छापे टाकण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्राप्तिकरच्या या छाप्यांचे राज्यभर पडसाद उमटले असून, लखीमपूरच्या हिंसाचाराची तुलना मी जालियनवाला बाग हत्याकांडाशी केल्याने सत्ताधाऱ्यांना त्याचा संताप किंवा राग आला असावा, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर, अहमदनगरमधील अंबालिका शुगर, साताऱ्यातील जरंडेश्वर साखर, नंदुरबार येथील पुष्पदंतेश्वर शुगर या पाच खासगी साखर कारखान्यांवरही छापे टाकण्यात आले. त्याशिवाय अन्य काही उद्योग समूहांवरही कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रत्येक ठिकाणी १ किंवा २ पथके पाठविण्यात आली होती. पथकात ६ ते १० अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयावर छापा टाकला. तेथील दस्तऐवज व इलेक्ट्रॉनिक गॅझेट ताब्यात घेऊन त्याची तपासणी करण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत अधिकारी कार्यालयात थांबून होते. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कार्यालयात सकाळी साडेसहाच्या सुमारास प्राप्तिकर विभागाचे पथक पोहोचले. कार्यालयाचा ताबा घेऊन तेथील सर्व कागदपत्रे, संगणक ताब्यात घेऊन तपासणी करण्यात आली, तर पवार यांच्या थोरल्या भगिनी विजया पाटील यांच्या येथील कोल्हापूरमधील राजारामपुरीतील मुक्ता पब्लिशिंग हाऊसच्या कार्यालयावर आणि वाशी (ता. करवीर) जवळील निवासस्थानांवर छापे टाकले. तसेच पवार यांच्या पुण्यातील बहिणीच्या घरीही छापे टाकण्यात आले. काटेवाडीत तीन गाड्या पोहोचल्या.

बारामती - इंदापूर रस्त्यालगत असणाऱ्या संबंधित पदाधिकाऱ्याच्या घरासमोर या गाड्या थांबल्या. अधिकाऱ्यांनी अंबालिका कारखान्याशी संबंधितांविषयी त्यांच्या निकटवर्तीयांकडे चौकशी केली. दाैंड तालुक्यातील आलेगाव पागा येथील दौंड शुगर कारखाना, एमआयडीसीतील एका डेअरी कंपनीवरही छापा टाकला. तब्बल ८ तासांहून अधिक वेळ डेअरीत चौकशी सुरू होती. १४ वर्षांपूर्वी दौंड सहकारी कारखाना विकत घेत त्याचे खासगीकरण करण्यात आले. अजित पवार यांचे नातलग असलेले नगर जिल्ह्यातील जगदीश कदम या कारखान्याचे अध्यक्ष आहेत, तर माजी आमदार बाळासाहेब जगदाळे यांचे पुत्र व जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे व मुंबईतील बडे प्रस्थ विवेक जाधव कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आहेत.

६० सहकारी साखर कारखान्यांना नोटिसा
काही दिवसांपूर्वी राज्यातील ६०हून अधिक सहकारी साखर कारखान्यांना प्राप्तिकर खात्याने नोटिसा बजावल्या आहेत. त्यांच्याकडे सात हजार कोटी प्राप्तिकर थकीत असल्याचे सांगण्यात येते. या कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या निर्धारित दरापेक्षा ऊस खरेदीसाठी दिलेली अधिकची रक्कम कारखान्याचा नफा आहे, असे करसूत्र लावून हा कर आकार लावण्यात आला आहे. त्याबाबत टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात येत असल्याचे समजते.

केंद्रीय संस्थांचा गैरवापर’
केंद्रीय संस्थांच्या होणाऱ्या गैरवापराबाबत आता जनतेनेच विचार करायची वेळ आल्याचे सांगून अजित पवार म्हणाले की, प्राप्तिकर विभागाने आज अनेक ठिकाणी छापे टाकले. माझ्याशी संबंधित काही संस्थांवर छापे पडले त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. मात्र, एका गोष्टीचे दु:ख आहे की, माझ्या बहिणी ज्यांची ४० वर्षांपूर्वी लग्न झाली, सुखाने संसार करत मुले आहेत, त्यांची लग्न होऊन नातवंडे आहेत. एक बहीण कोल्हापूर आणि दोन बहिणी पुण्यात आहेत, त्यांच्यावर छापे टाकले आहेत. याच्या पाठीमागचे कारण समजू शकले, असेही अजित पवार म्हणाले. प्राप्तिकर विभागाला योग्य वाटेल ते करू शकतात. परंतु, ज्यांचा काही संबंध नाही त्यांच्यावर छापे टाकले त्याचे वाईट वाटले. अनेक सरकारे येत जात असतात. शेवटी जनता सर्वस्व आहे. जनता योग्य निर्णय घेते. मागील निवडणुकीच्या आधी शरद पवार यांचा बँकेशी संबंध नसतानाही ईडीने नोटीस काढली होती. त्यातून रामायण म्हणा किंवा राजकारण म्हणा घडले आणि जनतेने बोध घेतला, असे सूचक विधानही पवार यांनी यावेळी केले. 

प्राप्तिकर विभागाने कुणावर छापेमारी करावी हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना शंका आली म्हणून त्यांनी छापेमारी केली. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर छापेमारी झाली आहे. आम्ही दरवर्षी कर भरणारे आहोत. कारण, मी स्वत: अर्थमंत्री आहे. आर्थिक शिस्त कशी लावायची, कर चुकवायचा नाही, कर व्यवस्थितपणे कसा भरायचा हे मला माहीत आहे. - अजित पवार, उपमुख्यमंत्री

‘रक्ताचे नातेवाईक म्हणून छापे टाकणे वाईट’

प्राप्तिकर विभागाने माझ्याशी संबंधित कंपन्यांवर छापे टाकले त्याबद्दल मला काही वाटत नाही; पण फक्त अजित पवारचे रक्ताचे नातेवाईक किंवा बहिणी म्हणून खात्याने छापे टाकले ते वाईट आहे. माझ्या बहिणींचा राजकारणाशी, कंपन्यांशी दुरान्वये संबंध नाही. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण कसे करू शकतात, हे काही कळत नाही, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांबद्दल आपली भावना व्यक्त केली. 

 

Web Title: Ajit Pawar: Conspiracy against DCM Ajit Pawar? Offices of relatives with son, IT raids at residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.