Ajit Pawar on Chhagan Bhujbal: विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर महायुतीचे सरकार राज्यात स्थापन झालं. मात्र मंत्रिपद न मिळाल्याने अनेकांनी थेट हिवाळी अधिवेशनातच नाराजी व्यक्त केली होती. यामध्ये माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचेही नाव होते. मंत्रिपद न मिळाल्याची नाराजी छगन भुजबळ यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती. भुजबळ यांना डावलण्याबाबत राष्ट्रवादीकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलं नव्हतं. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत भाष्य केलं आहे. भुजबळांनी राज्यसभेमध्ये जावं असं वाटत होतं असं अजित पवार म्हणाले.
महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आलं होतं. यानंतर तीव्र शब्दांत छगन भुजबळ यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. मी तुमच्या हातातील लहान खेळणं नाही. राज्यसभेची जागा आली तेव्हा मला जाऊ द्या असं म्हटलं. त्यावेळी सुनेत्रा पवारांना पाठवायचं ठरल्याचे भुजबळ म्हणाले होते. त्यानंतर आता एबीपी माझ्याच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी भुजबळांच्या नाराजीवर भाष्य केलं.
"मी छगन भुजबळ यांना भेटलो नाही असं म्हणण्याला काही अर्थ नाही. मी असं म्हटलो होतो की, भुजबळ साहेब नेते आहेत. त्यांनी आता राज्यसभेवर जावं. राष्ट्रीय नेते म्हणून त्यांनी अनेकदा वेगवेगळ्या राज्यांमध्ये सभा घेतलेल्या आहेत. त्यांचे काम त्या पद्धतीचे आहे. त्यांनी मुंबई महानगरपालिकेत काम केलं आहे. विधान परिषदेत आणि विधानसभेतही काम केलं आहे. दुर्दैवाने मागे लोकसभेत त्यांना संधी मिळाली होती पण यश आलं नाही. यावेळी लोकसभेच्या वेळी त्यांना संधी देण्याची चर्चा झाली. महायुतीमध्ये जागा वाटपात प्रमुखांनी सांगितले की त्यांना नाशिकची जागा द्या. पण तो लवकर निर्णय झाला नाही म्हणून त्यांनी सांगितले की मी उभा राहणार नाही. म्हणून राज्यसभेमध्ये त्यांनी जावं असं मला वाटत होतं. म्हणून मी त्या पद्धतीने विचार केला," असं अजित पवार म्हणाले.
छगन भुजबळ नाराज झाले होते का असाही सवाल यावेळी विचारण्यात आला. यावरही अजित पवारांनी भाष्य केलं. "त्यांना निश्चितपणे वाटलं असणार, परंतु माझा किंवा पक्षाचा तो हेतू अजिबात नव्हता. ते कालही आणि आजही आमच्यासाठी आदरणीय आणि वंदनीय आहेत, असंही अजित पवार म्हणाले.