अजित पवारांकडे टोल मागितला?
By Admin | Updated: November 24, 2014 02:53 IST2014-11-24T02:53:50+5:302014-11-24T02:53:50+5:30
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गाडी रविवारी रात्री टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अडवून त्यांच्याकडे टोल मागितल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात रंगली होती.

अजित पवारांकडे टोल मागितला?
कोल्हापूर : नातेवाइकांकडील एका कार्यक्रमासाठी कोल्हापुरात आलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गाडी रविवारी रात्री टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अडवून त्यांच्याकडे टोल मागितल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात रंगली होती. शिरोली टोलनाक्यावर हा प्रकार झाल्याचे बोलले जाते.
अजित पवार रात्री आठच्या सुमारास नातेवाईकांकडील घरगुती कार्यक्रम आटोपून परतत असताना शिरोली टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी त्यांची गाडी अडविली. कर्मचाऱ्यांनी चालकाकडून टोलची मागणी केली असता, चालकाने टोल देण्यास नकार दिला. त्यानंतर चालक व टोलवरील कर्मचाऱ्यांत किरकोळ शाब्दिक चकमक झाली. हा प्रकार पाहून गाडीत बसलेले अजित पवार खाली उतरले आणि कर्मचाऱ्यांची बोलती बंद झाली. नाक्यावर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस कर्मचारीही तातडीने त्यांच्याकडे धावत आले. पवार यांना पाहून पोलिसांनाही काही वेळ सुचेनासे झाले. अजित पवारांकडे टोल मागितल्याची चूक लक्षात येताच कर्मचाऱ्यांसह सुपरवायझरची भंबेरी उडाली. अखेर कर्मचाऱ्यांनी माफी मागितल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. हे वृत्त वाहनधारकांकडून शहरात वाऱ्यासारखे पसरले. पोलिसांसह टोलनाक्यावर चौकशी केली असता या वृत्ताला दुजोरा मिळाला नाही.