मुंबई - राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गट या तिन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होत आहे. दरम्यान, आपापल्या पक्षात प्रवेश देताना हे तिन्ही पक्ष एकमेकांचीही कोंडी करत आहेत. गेल्या काही दिवसांत भाजपाने शिंदे गट आणि अजित पवार गटातील विद्यमान आमदारांच्या प्रतिस्पर्ध्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. तर आता अजित पवार यांनी शरद पवार यांना धक्का देत पारंड्याचे माजी आमदार राहुल मोटे यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. या पक्षप्रवेशासोबतच अजित पवार यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांची कोंडी केली आहे.
या पक्षप्रवेशावेळी अजित पवार म्हणाले की, स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी आपल्याला बेरजेचे राजकारण शिकवले आणि ते आपण करतोय. जातीभेद, धर्म, पंथ न बाळगता एकत्र नांदण्याचा प्रयत्न करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या लोकांना घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्यामुळे जातीय सलोखा राखण्याची जबाबदारी आपली असली पाहिजे. लोकांचे प्रश्न त्यांच्यात मिसळून सोडवले गेले पाहिजे.
सत्तेच्या विरोधात जाऊन विकासकामे होत नसतात तर सत्तेत राहून जनतेची कामे होत असतात. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. त्यादृष्टीने कामाला लागा. भेदभाव न करता आपल्या पक्षाला कसे यश मिळेल याकडे लक्ष द्या. चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे पक्षाला फटका बसू शकतो, असेही अजित पवार यांनी आवर्जून सांगितले.