"महाराष्ट्रात मराठी आलंच पाहिजे, समजा येत नसेल तर..."; भाजपाच्या चित्रा वाघ यांनी दिली 'वॉर्निंग'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 17:00 IST2025-03-12T17:00:16+5:302025-03-12T17:00:44+5:30
Chitra Wagh, Airtel Gallery Marathi Controversy :

"महाराष्ट्रात मराठी आलंच पाहिजे, समजा येत नसेल तर..."; भाजपाच्या चित्रा वाघ यांनी दिली 'वॉर्निंग'
Airtel Gallery Marathi Controversy : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी विरूद्ध अमराठी असा वाद वाढताना दिसतोय. मराठी भाषेला आणि मराठी भाषकांना हक्काच्या महाराष्ट्रातच वाईट वागणूक दिली जात असल्याच्या घटना गेल्या काही दिवसांत घडल्या. नुकताच यातील एक प्रकार एअरटेल कंपनीच्या सर्व्हिस सेंटर गॅलरीमध्ये घडला. 'क्यू मराठी आना चाहिए? कहा लिखा हुआ है. हम हिंदुस्थान मैं रहते है', असे एक तरुणी मराठी तरुणाला म्हणत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एअरटेलच्या गॅलरीत तक्रार करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाने मराठी बोलण्याचा आग्रह केल्यानंतर तेथील तरुणीने मराठी बोलण्यास नकार देत हुज्जत घातली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. तशातच भाजपाच्या आमदार चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी थेट वॉर्निंग दिली आहे.
"एअरटेल गॅलेरीमध्ये उद्दाम आणि उध्दटपणा समोर आला आहे. एकतर महाराष्ट्रात राहता तर मराठी आलंच पाहिजे आणि समजा येत नसेल तर ती शिकण्याची तयारी आणि भाषेचा आदर ठेवायलाच पाहिजे," अशी तंबी चित्रा वाघ यांनी दिली आहे. मी @airtelindia ला विनंती करते की या व्हीडियोमध्ये दिसणाऱ्या मुलीवर ताबडतोब कारवाई करा. आणि यापुढे तुमच्या प्रत्येक गॅलेरीमध्ये मॅनेजर असो वा कोणतेही कर्मचारी त्यांना मराठी भाषा आलीच पाहिजे अशा जास्तीत जास्त लोकांची भरती झाली पाहिजे," अशी वॉर्निंग चित्रा वाघ यांनी ट्विट करत दिली. तसेच, महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा अनादर सहन केला जाणार नाही एरटेलने देखील त्या मुलीच्या वतीने तमाम मराठी भाषिकांची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.
एअरटेल गॅलेरीमधला उद्दाम आणि उध्दटपणा समोर आला आहे.
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 12, 2025
महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा अनादर सहन केला जाणार नाही एअरटेलने देखील त्या मुलीच्या वतीने तमाम मराठी भाषिकांची माफी मागावी…. @airtelindia@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde#मराठीभाषा… pic.twitter.com/lRyS92wF4v
नेमका काय घडला होता प्रकार?
मराठीचा मुद्दा महाराष्ट्रात तापलेला असतानाच एक व्हिडीओ समोर आला. एअरटेल गॅलरीत तक्रार घेऊन गेलेल्या तरुणाने मराठी बोला, अशी विनंती केली. त्यावर ती तरुणी म्हणाली की का मराठीत बोलू. तुम्हाला हिंदीत बोलता येत नाही का? त्यानंतर बराच गोंधळ झाला. तरुणी तिच्या वरिष्ठांना म्हणाली की, हा व्हिडीओ बनवतोय आणि महाराष्ट्रात मराठी आलं पाहिजे म्हणतोय. मराठी का आलं पाहिजे. असं कुठे लिहिले आहे?, असा उलट सवाल तरुणी मराठी तरुणाला करताना दिसली. आम्ही भारतात राहतो. भारतात कोणी कोणतीही भाषा बोलू शकतो, अशी हुज्जत तिने घातली.
एअरटेल प्रशासनाने नोंद घेऊन कर्मचाऱ्यांना मराठी भाषेचं महत्त्व समजावून सांगावं. महाराष्ट्रात एअरटेल चे असंख्य मराठी ग्राहक आहेत ते कायम ठेवायचे असतील तर योग्य पाउलं उचला नाहीतर मुंबईत एअरटेल ची गॅलरी दिसणार नाही. इतर भाषेचा विरोध नाही पण मराठी भाषिक ८०% कर्मचारी असायलाच हवे.… pic.twitter.com/xRBO2nSzqh
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) March 11, 2025
एअरटेलच्या गॅलरीत मराठी माणसं का नाहीत?
ठाकरेच्या शिवसेनेचे अखिल चित्रे आणि इतर पदाधिकारी एअरटेलच्या मुख्य कार्यालयात गेले. त्यांनी एअरटेलच्या गॅलरीत मराठी तरुण-तरुणी ठेवायला अडचण आहे काय? काही अडचण नाहीये, तर मग असं वारंवार का होतंय? आज जो प्रकार घडला, त्या गॅलरीत एकही मराठी मुलगा नव्हता. मुंबईतील एअरटेलच्या कामकाजात मराठी नाही तर मुंबईत एअरटेलची गॅलेरी नाही, असा इशारा अखिल चित्रे यांनी एअरटेलच्या अधिकाऱ्याला दिला.