गायकवाड आडनावामुळे विमानप्रवास त्रासदायक

By Admin | Updated: March 31, 2017 03:49 IST2017-03-31T03:49:09+5:302017-03-31T03:49:09+5:30

खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर प्रवासबंदी घातल्यानंतर त्याचा नाहक फटका लातूरचे भाजपाचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना

Air carrier due to Gaikwad surname is troublesome | गायकवाड आडनावामुळे विमानप्रवास त्रासदायक

गायकवाड आडनावामुळे विमानप्रवास त्रासदायक

लातूर : विमान कंपन्यांनी उस्मानाबादचे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर प्रवासबंदी घातल्यानंतर त्याचा नाहक फटका लातूरचे भाजपाचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना बसतो आहे. आडनाव एकच आणि दोघेही खासदार. त्यामुळे ‘खासदार गायकवाड’ म्हटले की विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांपासून सुरक्षारक्षकांपर्यंत सर्वजण त्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवित आहेत. या अकारण चौकशीचा वैताग आला आहे, अशा शब्दांत सुनील गायकवाड यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
खा. रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्यानंतर त्यांच्या विमानप्रवासावर बंदी आली. ते सुरुवातीला रेल्वेने आणि आता रस्तामार्गे प्रवासाला प्राधान्य देताहेत. मात्र लातूरच्या खासदारांना विमानप्रवास करताना ‘गायकवाड’ आडनावाचा फटका बसतो आहे. तिकिट बुक करताना हे आडनाव ऐकले की बुकिंगवाले कोणते गायकवाड? सुरुवातीचे नाव काय? काय करता? अशा प्रश्नांची सरबत्ती करत आहेत, अशी व्यथा त्यांनी मांडली. (प्रतिनिधी)

सुरक्षारक्षकांकडून प्रश्नांचा भडीमार

विमान कंपन्यांचे अधिकारीच काय तर सुरक्षारक्षकही त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडत आहेत. ही व्यथा सांगताना खा. सुनील गायकवाड म्हणाले, विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांपासून ते सुरक्षारक्षकांपर्यंत सारेच चौकशीसाठी थांबवितात ! विमानतळावर गेले की मला गायकवाड आडनावामुळे सारे शंकेने पाहातात. तिकीट बुक करताना हाच अनुभव येतो. कोणते गायकवाड ? तुमचा व्यवसाय काय ? तुम्हीसुद्धा खासदार आहात का ? कुठले खासदार आहात ? अशा प्रश्नांची सरबत्ती होते. चौकशीच्या नावे विनाकारण थांबवून ठेवले जाते. खिशातले सर्व वस्तू बाहेर काढून तो गायकवाड मी नाही हे समाजावावे लागते. मी तर काही गुन्हा केला नाही ? मग मला अशी वागणूक का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Web Title: Air carrier due to Gaikwad surname is troublesome