कार्यक्रमपत्रिका, स्मरणिकेचा नाही पत्ता

By Admin | Updated: January 21, 2017 03:29 IST2017-01-21T03:29:14+5:302017-01-21T03:29:14+5:30

९० वे मराठी साहित्य संमेलन स्मार्ट करण्याचा मानस जरी आयोजक आगरी युथ फोरमने व्यक्त केला

Agenda, No souvenir address | कार्यक्रमपत्रिका, स्मरणिकेचा नाही पत्ता

कार्यक्रमपत्रिका, स्मरणिकेचा नाही पत्ता


डोंबिवली : ९० वे मराठी साहित्य संमेलन स्मार्ट करण्याचा मानस जरी आयोजक आगरी युथ फोरमने व्यक्त केला असला, तरी अद्याप संमेलनाची कार्यक्रम पत्रिका आणि स्मरणिका छापून तयार झालेली नाही आणि त्याबाबत आयोजकांनी मिठाची गुळणी धरली आहे.
साहित्य संमेलनाचा मान डोंबिवलीतील आगरी युथ फोरमला मिळाल्यानंतर त्याच्या आयोजनासाठी स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी बैठका घेण्यास सुरुवात केली. महामंडळ आणि आयोजकांत बैठका पार पडल्या. बदलापूर, ठाणे आणि कल्याण येथे साहित्य संमेलनाच्या वातावरण निर्मितीसाठी कार्यक्रम घेण्यात आले. शाळाशाळांत जागृती करण्याचे ठरले. संमेलनाच्या तारखेची घोषणा झाल्यानंतर तीन दिवसांत प्रमुख १२ कार्यक्रम, परिसंवाद अशी रचनाही ठरली. संमेलन अवघ्या बारा दिवसांवर आल्याने कार्यक्रम पत्रिका छापून ती साहित्यिकांपर्यंत पोचणे अपेक्षित होते.
अर्थात संमेलनासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या काही वक्त्यांचे संमतीपत्र अद्याप मिळाले नसल्याने संमेलनाच्या निमंत्रण व कार्यक्रम पत्रिकेच्या छपाईत अडसर निर्माण झाला आहे. तोच प्रकार स्मरणिकेच्या बाबतीत आहे. साहित्य संमेलनासाठी निधी गोळा करण्याची कसरत सुरू असल्याने स्मरणिका, तिचा खर्च याबाबत कोणी बोलायला तयार नाही. पिंपरी-चिंचवडच्या संमेलनाची स्मरणिका एका ग्रंथासारखीच काढण्यात आली होती. त्या दर्जाची स्मरणिका करण्याचे सुरूवातीला ठरविण्यात आले असले, तरी अद्याप लेखांची जुळवाजुळव सुरु असल्याने तिची छपाई रखडल्याचे समजते.
महामंडळाचे ११०० सदस्य, सर्व संलग्न संस्था, कल्याण-डोंबिवलीतील शाळा-कॉलेज, आमदार, खासदार, साहित्यिक, प्रतिष्ठीत व्यक्ती, कलाकार आदींना संमेलनाचे निमंत्रण द्यायचे आहे. मात्र निमंत्रण पात्रिकेची छपाईच न झाल्याने त्यांच्यापर्यंत पात्रिका पोहवण्याचेही आव्हान आयोजकांपुढे आहे. (प्रतिनिधी)
>माहितीचा महामार्ग
संमेलनाबाबत स्वागताध्यक्ष गुलाब वझे आणि आयोजक आगरी युथ फोरमकडून अधूनमधून माहिती मिळते. मात्र महामंडळाकडून पुणे आणि नागपूरचे प्रतिनिधी माहिती देतात. त्यामुळे संमेलनाच्या माहितीचे अनेक महामार्ग तयार झाल्याचे दिसून येते. आधीच नोटाबंदी आणि कोकण शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहितेमुळे आयोजक मेटाकुटीला आलेले असताना त्यात परस्परविरोधी माहितीमुळे भर पडते आहे.

Web Title: Agenda, No souvenir address

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.