लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीचा समावेश पनवेल महापालिकेत करण्यात आला. या २३ गावांतील ३८४ कामगारदेखील या वेळी पालिकेकडे वर्ग करण्यात आले. मात्र, या वेळी नियमबाह्य कामगार भरतीची तक्रारी आल्यावर या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांकडून समितीची स्थापना करण्यात आली. पालिकेच्या स्थापनेपासून कामगारांना पगार मिळाला नव्हता, त्यानंतर १२ एप्रिल रोजी या कामगारांनी कुटुंबांसह अॅड. सुरेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर धडक दिली. त्यानंतर सर्व कामगारांना सहा महिन्यांचे पगार देण्याचे तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी आदेश दिले. मात्र, पुन्हा कामगारांचा तीन महिन्यांचा पगार पालिकेने रोखून धरल्याने कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. ३८४ कामगारांचे तीन महिन्यांचे पगार पुन्हा रखडल्याने कामगार चिंतेत आहेत. यासंदर्भात सर्व कामगारांची बैठक आयोजित करण्यात आली असून, आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचे सुरेश ठाकूर यांनी सांगितले. कामगारांमध्ये प्लंबर, सफाई कामगार, चालक, लिपिक, शिपाई आदींचा सामावेश आहे. कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अंतिम निर्णय आला नसल्याने कामगारांचा पगार पुन्हा रखडला आहे. मात्र, या कामगारांना दिवसभर राबवून घेतले जात असताना पगार देताना अडवणूक योग्य नसल्याची प्रतिक्रि या ठाकूर यांनी दिली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कामगारांना राबवून घेण्यासाठी सहा महिन्यांचा रखडलेला पगार देण्यात आला का? असा प्रश्नही या वेळी उपस्थित होत आहे. >कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे कामगारांचे पगार रखडले आहेत. समितीने अहवाल सादर केल्यावर त्यानंतर पगारवाटप करण्यात येईल. - डॉ. सुधाकर शिंदे, आयुक्त
पुन्हा पालिकेतील ३८४ कामगारांचे पगार रखडले
By admin | Updated: July 15, 2017 02:36 IST