पॅट परीक्षेचा गणितापाठोपाठ इंग्रजीचा पेपरही यूट्यूबवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:44 IST2025-10-14T15:44:43+5:302025-10-14T15:44:55+5:30
या प्रकरणीही पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) संचालक राहुल रेखावार यांनी ‘लोकमत’ला दिली.

पॅट परीक्षेचा गणितापाठोपाठ इंग्रजीचा पेपरही यूट्यूबवर
मुंबई : पिरिऑडिकल टेस्टचा (पॅट) गणिताचा पेपर यूट्यूबवर व्हायरल झाल्यावर आता इंग्रजीचा पेपरही उत्तरांसह रविवारी यूट्यूबवर व्हायरल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणीही पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) संचालक राहुल रेखावार यांनी ‘लोकमत’ला दिली.
राज्यातील एक लाख नऊ हजार शाळांमध्ये १० ते १३ ऑक्टोबरदरम्यान घेतलेल्या ‘पॅट’च्या प्रश्नपत्रिका ‘एससीईआरटी’ने वितरित केल्या. १० ऑक्टोबरला गणिताचा पेपर उत्तरांसह यूट्यूबवर व्हायरल झाला, त्याबाबत शिक्षण विभागाने गुन्हा दाखल केला. मात्र, १३ ऑक्टोबरच्या इंग्रजी पेपरची प्रश्नपत्रिका आदल्या दिवशीच १२ ऑक्टोबरलाच एका मराठी यूट्यूब चॅनेलवर उत्तरांसह व्हायरल
झाली आहे.
यू-डायसनुसार प्रश्नपत्रिका वितरित
यू-डायसमधील आकडेवारीनुसार प्रश्नपत्रिका छापून वितरित करण्यात आल्या. ज्या शाळांनी ऑगस्ट अखेरपर्यंतही माहिती अद्ययावत केलेली नव्हती, त्या शाळांना लेखी आदेशातच नमूद केले होते की, त्यांनी प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स प्रती स्वतः तयार कराव्यात. शिवाय, पाच टक्के जादा प्रश्नपत्रिकाही पाठविण्यात येतात. ८५ लाख विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका पाठवल्या होत्या, असे रेखावार यांनी सांगितले.
या परीक्षेमधून पास-नापास ठरवले जात नाही. मग त्यावर इतका मोठा खर्च करण्याची गरज नाही. पूर्वीप्रमाणे शाळा स्तरावरच प्रश्नपत्रिका तयार करणे, हे सुरू केले, तर हा शिक्षण विभागाचा खर्च वाचेल.
विजय कोंबे, कार्याध्यक्ष, राज्य प्राथमिक शिक्षक समिती