मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार राज्यात आले. मात्र गेल्या १० महिन्यात महायुती सरकारमागचं वादाचं ग्रहण वाढतानाच दिसत आहे. सरकारमधील मंत्री, आमदारांच्या वर्तवणुकीमुळे जनतेमध्ये नाराजी आहे. त्यातच हिंदी सक्तीविरोधात पहिल्यांदाच ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले. राज आणि उद्धव या दोन्ही नेत्यांची जवळीक वाढली त्यामुळे सरकारची डोकेदुखी आणखी वाढली आहे. आता शेतकरी कामगार पक्षानेही महायुती सरकारविरोधात कंबर कसली आहे.
येत्या २ ऑगस्ट रोजी पनवेल इथं शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या मेळाव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे उपस्थित राहून शेकापच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. अलीकडेच शेकापचे जयंत पाटील यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जात राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज यांना पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले होते. पनवेल इथे होणाऱ्या या मेळाव्याला राज्यभरातून हजारो कार्यकर्ते हजर राहणार आहेत. या सोहळ्याचा आढावा घेण्यासाठी अलिबाग येथील शेतकरी भवनात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
याबाबत शेकापच्या प्रवक्त्या म्हणाल्या की, शेतकरी कामगार पक्ष एक वेगळ्या भूमिकेतून आगामी काळात काम करणार आहे. रोजगारासह वेगवेगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लढा दिला जाणार आहे. जनतेचे प्रश्न शेकाप सोडविणार आहे. सध्याचे राजकारण अतिशय भयावह आहे. अनेक तरुणांना नोकरीचे गाजर दाखविले जाते. परंतु, त्यांना वेतन दिले जात नाही. नोकरी व रस्त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास सत्ताधाऱ्यांना वेळ नाही. हनी ट्रॅप, डान्सबार, ऑनलाईन रमीमध्ये नेते मग्न आहेत. अलिबागसह अनेक भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. खड्ड्यांमुळे अपघात होऊन जीवितहानी होत आहे असं त्यांनी सांगितले.
शेकापच्या व्यासपीठावरून राज ठाकरे घेणार सरकारचा समाचार
दरम्यान, मराठी भाषा, मराठी माणसांसोबतच राज ठाकरे ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नांना यानिमित्ताने हात घालण्याची शक्यता आहे. हिंदी सक्ती मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत सर्व पक्षांना मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन केले होते. राज यांच्या आवाहनाला उद्धव ठाकरेंसह काँग्रेस-राष्ट्रवादी, शेकाप, माकप यासारख्या विविध पक्षांनी प्रतिसाद दिला होता. ५ जुलैला राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरून मोर्चाची घोषणा केली मात्र त्याआधीच सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या मोर्चाचे रुपांतर ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात झाले होते. त्यानंतर हे दोन्ही बंधू एकत्र येतील अशी दाट शक्यता निर्माण झाली. त्यात आता शेकापच्या व्यासपीठावर जात राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार हे पाहणे गरजेचे आहे.