विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार हजेरी
By Admin | Updated: July 14, 2017 10:05 IST2017-07-14T10:05:02+5:302017-07-14T10:05:52+5:30
लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात गुरुवारी दुपारपासून जोरदार पावसाला सुरू आहे. गेल्या 18 तासांमध्ये शहरात तब्बल 213 मिमी पावसाची नोंद झाली

विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार हजेरी
>ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 14 - लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात गुरुवारी दुपारपासून जोरदार पावसाला सुरू आहे. गेल्या 18 तासांमध्ये शहरात तब्बल 213 मिमी पावसाची नोंद झाली असून येथील नदीनाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत.
जून महिन्यात जोरदार सरी बरसल्यानंतर मागील आठवड्या भरापासून पावसाने विश्रांती घेतली होती. यानंतर गुरुवारी पावसाचे पुनरागमन झाले आहे. गुरुवारी दुपारी 2 वाजल्यापासून लोणावळ्यात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झालेली ती संततधार अद्यापही कायम आहे.
गुरुवारी दुपारी 2 वाजल्यापासून ते शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यत 213 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जोरदार पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून काही रस्ते जलमय झाले आहेत. डोंगरभागातून मोठ्या प्रमाणात धबधबे वाहू लागले आहेत. पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणार्या पवना धरणाच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली असून धरणांने 50 टक्क्याचा टप्पा ओलांडला आहे.
तर दुसरीकडे, नाशिक शहर परिसरात गुरुवारी ( 13 जुलै ) रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रामकुंड परिसराला पाण्याचा वेढा पडला असून परिसरातील व्यवहार यामुळे ठप्प झाले आहेत.
दशक्रिया विधिसाठी आलेल्या नागरिकांचे हाल झाल्याने परिसरातील धर्मशाळेतच सध्या धार्मिक विधि सुरू आहेत. शहराच्या सर्वच भागात पावसाचा जोर कायम असून ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.