कर्जमाफीनंतर आता धनगर आरक्षणासाठी विरोधकांची घोषणाबाजी
By Admin | Updated: July 21, 2015 14:08 IST2015-07-21T13:58:48+5:302015-07-21T14:08:32+5:30
कर्जमुक्तीनंतर आता धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. मंगळवारी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांनी धनगराच्या वेशात विधानसभेत जोरदार घोषणाबाजी केली.

कर्जमाफीनंतर आता धनगर आरक्षणासाठी विरोधकांची घोषणाबाजी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - कर्जमुक्तीनंतर आता धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले आहे. मंगळवारी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांनी धनगराच्या वेशात विधानसभेत जोरदार घोषणाबाजी केली.
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेत येऊनही देवेंद्र फडणवीस सरकारने अद्याप धनगर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावलेला नाही. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी शेतक-यांना कर्जमाफी करावी अशी मागणी करत गोंधळ घातला होता. मात्र सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेत विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. कर्जमाफीच्या मागणीनंतर आता विरोधकांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा हाती घेतला आहे. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदी नेते धनगरांच्या वेशात सभागृहात आले. येळकोट येळकोटचा गजर करत या नेत्यांनी विधीमंडळात जोरदाऱ घोषणाबाजी केली.
यंदाचे अधिवेशन हे विरोधकांच्या आंदोलनामुळे चांगलेच गाजत असून यापूर्वी विरोधी पक्षांनी भजन व चिक्की खात विरोध दर्शवला होता. याशिवाय विधीमंडळाच्या पाय-यांवर बसून विरोधकांनी सादर केलेल्या खोचक कविता या चर्चेच्या विषय ठरल्या होत्या.