उदयनराजेंच्या अटकेनंतर सातारकरांचा उत्स्फूर्त बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 16:07 IST2017-07-25T12:33:43+5:302017-07-25T16:07:46+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांना खंडणीच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यानंतर सातारा शहरात बंद पाळण्यात आला आहे.

उदयनराजेंच्या अटकेनंतर सातारकरांचा उत्स्फूर्त बंद
>ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 25 - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांना खंडणीच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यानंतर सातारा शहरात बंद पाळण्यात आला आहे. खंडणीच्या गुन्ह्यात उदयनराजे भोसले मंगळवारी सकाळी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर होताच सातारा शहराची बाजारपेठ उघडलीच नाही. काही व्यापा-यांनी उघडलेले शटर पुन्हा तत्काळ बंद करुन घरी जाणे पसंत केले. येथील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पुकारला. साताऱ्यातील बरेच व्यवहार ठप्प झाले आहेत. तसेच अनेक शाळाही बंद ठेवण्यात आल्याचं वृत्त आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांना जिल्हा न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून जामीनासाठी लगेच दुपारी अर्ज केला जाणार आहे.
पोलीस अधीक्षक संदीप पाटील अन् अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी उदयनराजेंना घेऊन तालुका पोलीस ठाण्याजवळील पोलीस खात्याचे विश्रामगृह गाठले. या ठिकाणीच कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली. विशेष म्हणजे या दोन प्रमुख पोलीस अधिका-यांव्यतिरिक्त कुणालाही आत जावू दिले नाही. याठिकाणी राखीव पोलीस दलासह प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेकडोंच्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सर्वच यंत्रणाला कामाला लागली होती. यानंतर उदयनराजेंना थेट जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. याठिकाणीही कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमली होती. पोलिसांचा बंदोबस्तही कडक ठेवण्यात आला होता. दरम्यान, शहरात काही ठिकाणी तोडफोडी झाल्याच्या अफवा पसरल्या असून यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी उदयनराजे भोसलेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यासोबत तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी 9 जणांना अटकही करण्यात आली आहे. उदयनराजे यांनी याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. पण हायकोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.
आणखी बातम्या वाचा