Aditya Thackeray: दिशा सालियन प्रकरणाची नव्याने चौकशी होणार; फडणवीसांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 14:24 IST2022-12-22T14:22:59+5:302022-12-22T14:24:06+5:30
दिशा सालियन प्रकरणात भाजपाचे नितेश राणे आणि शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

Aditya Thackeray: दिशा सालियन प्रकरणाची नव्याने चौकशी होणार; फडणवीसांची मोठी घोषणा
केंद्रात राहुल शेवाळे यांनी सुशांत सिंह प्रकरणानंतर एयु नावाचे ४४ फोन कॉल झाल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्रात मोठी घडामोड घडली आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना धक्का देणारा निर्णय घेतला आहे.
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी नव्याने चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दिल्लीहून दिशा सालियन प्रकरणी चौकशी अहवाल मागवून घेण्यात येणार आहे. तो पाहून पुढील चौकशीचे स्वरुप ठरविले जाईल, कोणाकडे अधिकचे पुरावे असतील तर त्यांनी ते द्यावेत, असे फडणवीस म्हणाले आहेत.
या प्रकरणी भाजपाचे नितेश राणे आणि शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी आक्रमक पवित्रा घेतला. सभागृहात भरत गोगावले म्हणाले की, ९ जून २०२० ला दिशा सालियान युवतीचा संशयास्पद मृत्यू होणे. दिशाचा मृत्यू कुठल्या परिस्थितीत झाला? तपासात अद्याप निष्कर्षापासून पोहचले नाही. दिशा सालियान ही सुशांत सिंह राजपूतचे काम सांभाळत होती. त्या दोघांमध्ये झालेला फोन संवाद, व्हॉट्सअप चॅट उघड न होणे. दिशा मृत्यूनंतर सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू होणे. या मृत्यूचे गुढ उकललं नाही. या प्रकरणी सत्य बाहेर येणे गरजेचा आहे. दिशा सालियानचा मृत्यूवेळी तिच्यासोबत कोण कोण होते? हे समोर यायला हवा. दिशा सालियानच्या मृत्यूशी पूर्णपणे चौकशी होऊन दोषींना शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणी खुलासा होणे गरजेचे आहे असं त्यांनी म्हटलं.
नितेश राणे काय म्हणाले...
एका मुलीचा संशयास्पद मृत्यू होतो आणि त्याची चौकशी मुंबई पोलीस करतात. त्या चौकशीत दोनदा तपास अधिकारी बदलला जातो. ८ जूनच्या रात्री कोण कोण उपस्थित होता. कुणाच्या राजकीय दबावापोटी हे प्रकरण दडपण्यात आले. दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे नसून मुंबई पोलिसांकडे ही केस आहे. सीसीटीव्ही फुटेज का गायब करण्यात आले. ८ जूनच्या पार्टीत कोण होते? या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. त्या रात्री कुठला मंत्री होता? काहीतरी लपवण्यासाठी विरोधक गोंधळ घालतायेत का? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणेंनी केला. सरकारने या प्रकरणाची फेरचौकशी करावी अशी मागणी सत्ताधारी आमदारांकडून करण्यात आली.