निर्लज्जपणा बाजूला ठेवा, महाराष्ट्रातील जनतेला उत्तरे द्या; आदित्य ठाकरे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 06:56 PM2024-01-19T18:56:12+5:302024-01-19T18:56:55+5:30

स्वखर्चाने दावोसला जाणारे कोणकोण आहेत, त्यांनी परराष्ट्र खात्यांची परवानगी घेतली होती का? त्यांचे पद आणि दावोसला जबाबदारी काय हे सरकारने सांगावे अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 

Aditya Thackeray criticized CM Eknath Shinde over his visit to Davos | निर्लज्जपणा बाजूला ठेवा, महाराष्ट्रातील जनतेला उत्तरे द्या; आदित्य ठाकरे संतापले

निर्लज्जपणा बाजूला ठेवा, महाराष्ट्रातील जनतेला उत्तरे द्या; आदित्य ठाकरे संतापले

मुंबई - घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी ऊठसूठ सर्वांना आश्वासने दिली. परंतु एकही काम झाले नाही. वेदांतासारखा प्रकल्प राज्यातून बाहेर गेला. त्यापेक्षा मोठा प्रकल्प आणू असं सांगितले गेले. पण अजून काहीही झाले नाही. महाराष्ट्र सरकारने जे इकोनॉमी कौन्सिल बनवलं आहे त्याचे अध्यक्षच गुजरातला जाऊन ७० हजार कोटींची गुंतवणूक करतात. मग तुमच्या हातात काय राहिले?. गुजरातच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रात मॅग्नेटिक महाराष्ट्र घेतला गेला नाही. स्वखर्चात परदेश दौरा करणाऱ्यांची नावे जाहीर करा. निर्लज्जपणा बाजूला ठेवा आणि महाराष्ट्राला जी काही उत्तरे द्यायला हवीत ती द्या अशी मागणी करत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. 

आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर ५० लोक सोबत होते. पण माझ्या टीकेनंतर ५-६ लोक कमी केले. त्यानंतर ४० जणांना दावोसला नेले. या दौऱ्याला २० कोटीहून अधिक खर्च दाखवू नका असं सांगितले. हा पैसा सामान्य लोकांच्या करातून जात आहे. जे उद्योगपती मुंबईत भेटायला हवे होते तेच दावोसला भेटले. दावोसला जाऊन मुख्यमंत्र्यांनी कामशून्य केले. मविआ सरकार असताना मी साधा मंत्री म्हणून दावोसला गेलो होतो. तेव्हा वर्ल्ड इकोनॉमी फोरमचं काँग्रेस सेंटर तिथे मला ३ ठिकाणी बोलायला संधी मिळाली. आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी त्या काँग्रेस सेंटरमध्ये बोलल्याचे एकही फोटो नाही. ४० गुंडाची टोळी नेली. परंतु मित्र पक्षाच्या खात्यामधील कुणालाही नेले नाही असा आरोप त्यांनी केला. 

तसेच मागील वर्षी जे करार केले त्याचे पुढे काहीच होत नाही. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना बर्फात जाऊन खेळायचे होते. जेवढा खर्च मुख्यमंत्र्यांनी दावोसला केला तितका खर्च त्यांनी त्यांच्या गावात जिथं २ हेलिपॅड उभारले आहेत. तिथे या सर्वांना घेऊन आला तर महाराष्ट्राचा काही फायदा झाला असता. पण दुर्दैवाने एकाबाजूला व्हायब्रेंट गुजरात झाले. तिथे २६ लाख कोटी रुपयांचे MOU झाले. तामिळनाडू सरकारनेही हिंमत करून समिट घडवून आणले. तिथे सहा लाख कोटींची गुंतवणूक ते त्यांच्या राज्यात घेऊन गेले. पण महाराष्ट्रात मॅग्नेटिक महाराष्ट्र गेल्या २ वर्षापासून झाले नाही. स्वखर्चाने दावोसला जाणारे कोणकोण आहेत, त्यांनी परराष्ट्र खात्यांची परवानगी घेतली होती का? त्यांचे पद आणि दावोसला जबाबदारी काय हे सरकारने सांगावे अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 

दरम्यान, राजन साळवी, रवींद्र वायकर, सुरज चव्हाण, किशोरी पेडणेकर यांच्यामागे तपास यंत्रणा लागली आहे. तरीही हे नेते लढतायेत. काहीही झाले तरी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितले आहे. ज्यांच्याकडे काही लपवण्यासारखे नाही ते आमच्यासोबत आहेत. लपवण्यासारखे ज्यांच्याकडे आहे ते भाजपा-शिंदे गटात जातात. सत्य बोलणाऱ्यांना नोटीस दिली जाते. ईडी, सीबीआयकडून आमच्या नेत्यांवर सातत्याने दबाव टाकला जात आहे असा आरोप आदित्य ठाकरे यांनी भाजपावर केला आहे. 

Web Title: Aditya Thackeray criticized CM Eknath Shinde over his visit to Davos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.