नागपूर - मुख्यमंत्रिपदावरून युती तुटल्यापासून शिवसेना आणि भाजपा एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही आहेत. आता राज्यपालांच्या अभिभाषणावर मत मांडताना युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपाला जोरदार टोला लगावला आहे. आता पाहिजे तिथे चिखल करा आणि कमळ फुलवा; असे आम्ही होऊ देणार नाही. महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने भयमुक्त सरकार स्थापन झाले आहे, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी भाजपावर टीका केली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर आपले मत व्यक्त करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, '' आता पाहिजे तेथे चिखल करा आणि कमळ फुलवा, असे आम्ही होऊ देणार नाही. महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने भयमुक्त सरकार स्थापन झाले आहे. सत्तेची हाव काशी असते व मित्राला कसे डावलले जाते हे ही मी पाहिले आहे. आता महाआघाडीत आमचे आवाज वेगवेगळे असले तरी आमच्यात एकमत आहे एवढे नक्की, असा चिमटा त्यांनी भाजपाला काढला. ''नोटाबंदी आणि उद्योग बुडाले. मात्र आता महाविकास आघाडीचे सरकार रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करेल याचा विश्वास आहे. शिक्षण केजी टू पीजी बदलले पाहिजे. त्यात नोकरीची हमी हवी. डिजिटल एज्युकेशन गावपातळीवर न्यावे लागेल,''असे मतही आदित्य ठाकरे यांनी मांडले. हे वचनपूर्ती सरकार आहे. राज्यपालांचे भाषण लहान असले तरी त्यात कुठेही जुमला नाही. आमचा महाविकास आघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम असला तरी कॉमन मॅक्सिमम प्रोग्रेस हे ध्येय आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पाहिजे तेथे चिखल करा आणि कमळ फुलवा, हे आम्ही होऊ देणार नाही; आदित्य ठाकरेंचा भाजपाला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 20:58 IST