रायगड: रायगड किल्ल्यावरील मेघडंबरीत फोटो सेशन केल्यानं चौफेर टीकेचा सामना करावा लागल्यानंतर अभिनेता रितेश देशमुखनं माफी मागितली आहे. महाराजांच्या चरणाजवळ बसण्यामागे केवळ भक्तीभाव होता. कोणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. मात्र तरीही आमच्या कृत्यामुळे कोणी दुखावलं असल्यास आम्ही त्यांची माफी मागतो, असं रितेश देशमुखनं म्हटलं आहे. अभिनेता रितेश देशमुख, दिग्दर्शक रवी जाधव यांच्यासह पानीपतकार विश्वास पाटील यांनी काल थेट रायगडावरील मेघडंबरीत फोटो सेशन केलं. हे फोटो पाहून सामान्य शिवभक्त चांगलेच संतापले होते. सामान्य शिवभक्तांना सुरक्षेच्या कारणास्तव सिंहासनाजवळ जाऊ दिलं जात नाही. मग रितेश देशमुख, रवी जाधव सिंहासनावर जाऊन फोटोशूट कसं करतात, असा प्रश्न शिवभक्तांकडून उपस्थित केला गेला. अनेकांनी सोशल मीडियावर रितेश देशमुख आणि रवी जाधव यांच्या या कृतीचा निषेध केला. त्यानंतर रितेश देशमुखनं फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शिवभक्तांची माफी मागितली.
मेघडंबरीतील फोटो सेशनबद्दल रितेश देशमुखनं मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 12:00 IST