अभिनेत्री जुई गडकरीला जीवे मारण्याची धमकी
By Admin | Updated: July 14, 2015 00:23 IST2015-07-14T00:23:11+5:302015-07-14T00:23:11+5:30
मूळची कर्जतची असलेली आणि सध्या कामानिमित्त ठाणे येथे राहणारी अभिनेत्री जुई गडकरी हिला ठार मारण्याची धमकी सहा दिवसांपूर्वी एका चिठ्ठीव्दारे देण्यात आली आहे.

अभिनेत्री जुई गडकरीला जीवे मारण्याची धमकी
कर्जत : मूळची कर्जतची असलेली आणि सध्या कामानिमित्त ठाणे येथे राहणारी अभिनेत्री जुई गडकरी हिला ठार मारण्याची धमकी सहा दिवसांपूर्वी एका चिठ्ठीव्दारे देण्यात आली आहे. याबाबत जुईने कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. अद्याप पोलिसांच्या हाती काहीच न लागल्याने गडकरी कुटुंब भीतीच्या सावटाखाली आहे.
कर्जत शहरातील विठ्ठलनगर परिसरात यशोदत्त अपार्टमेंटमध्ये जुई राहते. विविध मालिकांत आणि जाहिरातींमध्ये ती काम करते. शूटिंगसाठी मुंबईला जावे लागत असल्याने सध्या जुई ठाण्यात राहत आहे. ८ जुलैला जुईचा वाढदिवस होता. त्या दिवशी दुपारी एका बारा-तेरा वर्षांच्या मुलाने तिच्या काकांकडे एक चिठ्ठी दिली, ज्यात तिला २० तारखेला मारणार असल्याची धमकी देण्यात आली होती. ज्या मुलाने ही चिठ्ठी दिली, त्याला जबरदस्तीने पाठविण्यात आल्याचे त्याने सांगितले. जुईच्या काकांनी मुलाचा फोटो काढून पोलिसांना दिला आहे. जुई सध्या ठाण्यात ज्या घरात राहते, ते देखील बंद आहे. याप्रकरणी तपास करण्यात येत असल्याची माहिती कोपरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. एस. काळबांडे यांनी दिली.