वाहतूक नियम मोडणाऱ्या गोविंदांवर होणार कारवाई
By Admin | Updated: August 16, 2014 02:45 IST2014-08-16T02:45:29+5:302014-08-16T02:45:29+5:30
वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे प्रत्येक वर्षी दहीहंडीच्या दिवशी वाहतुकीचे नियम गोविंदा पथकांकडून पायदळी तुडवले जातात

वाहतूक नियम मोडणाऱ्या गोविंदांवर होणार कारवाई
मुंबई : वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे प्रत्येक वर्षी दहीहंडीच्या दिवशी वाहतुकीचे नियम गोविंदा पथकांकडून पायदळी तुडवले जातात. हे पाहता यंदा वाहतूक नियम मोडणाऱ्या गोविंदांविरोधात वाहतूक पोलिसांनी दंड थोपटण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी वाहतूक पोलिसांकडून फौजफाटा त्या दिवशी वाढवण्यात येणार आहे.
दहीहंडीच्या दिवशी अनेक गोविंदा पथके मोठ्या प्रमाणात ट्रक, टेम्पो आणि दुचाकी घेऊन बाहेर पडतात. त्या वेळी प्रत्येक गोविंदा पथकात जास्तीत जास्त गोविंदा सोबत असल्याने वाहनांची संख्याही तेवढीच मोठी असते. मात्र या वाहनांतून दिवसभर प्रवास करताना अनेक गोविंदांकडून वाहतुकीचे नियमच पायदळी तुडवले जातात. ट्रक किंवा टेम्पोमध्ये गोविंदा खचाखच भरलेले असतानाच या वाहनांच्या टपावरही बसून किंवा लटकून प्रवास करतात. त्याचप्रमाणे दुचाकींवरही तीन-तीन गोविंदा प्रवास करतात. असा धोकादायक प्रवास करताना अनेक गोविंदा जखमी होतात किंवा त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागते.
मात्र यंदा अशा प्रकारांना रोखण्यासाठी दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात येणार आहे. साधारण एक हजार वाहतूक पोलीस नेहमी कार्यरत असतात. मात्र दहीहंडीच्या दिवशी ५०० ते ६०० पोलीस अधिक तैनात करण्यात येतील. तसेच ज्या रस्त्यांवरून सर्वाधिक गोविंदा पथकांची वाहने जातात, अशा रस्त्यांवर हे पोलीस तैनात असतील, असे सह पोलीस आयुक्त (वाहतूक) बी. के. उपाध्याय यांनी सांगितले. अशी २५ ठिकाणे पोलिसांनी निश्चित केली असल्याचेही ते म्हणाले. गोविंदा पथक किंवा गोविंदांनी नियम मोडल्यास वाहतूक पोलिसांकडून तत्काळ दंड ठोठावला जाईल, असे उपाध्याय यांनी सांगितले. (प्रतिनिधी)