Devendra Fadnavis ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली असून याप्रकरणी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन सादर केलं. हत्या प्रकरणातील आरोपी कोणाशीही संबंधित असतील तरी त्यांच्यावर कारवाई होणारच, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे. तसंच ज्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे तो राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर खंडणीप्रकरणी कारवाई होईल आणि हत्येत सहभाग असेल तर त्याप्रकरणीही कारवाई होईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर मस्साजोग इथं सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या दोन्ही गुन्ह्यांचा काय संबंध आहे, याची आपण चौकशी करत आहोत. मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की, या गुन्ह्याचा मास्टरमाईंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल. आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून सांगतो, तो कोण आहे, कोणत्या पक्षाचा आहे, कोणा-कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल," असं फडणवीस यांनी सांगितलं.
"पाळंमुळं खणून काढणार, आरोपींवर मकोकाही लावणार"
"ज्या प्रकारे बीड जिल्ह्यात अराजकताचं राज्य तयार करण्याचा प्रयत्न होतोय, कोणावरही खोटे गुन्हे दाखल करायचे चुकीचे प्रकार घडत आहेत. मी तेथील डीजींनाही सांगितलं की, यात पोलीस प्रशासनाचाही दोष आहे. मध्यंतरीच्या काळात निर्ढावलेल्या लोकांनी चुकीचं काम केलं आहे. हे सहन केलं जाणार नाही. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांची पाळंमुळं खोदून काढू. यांच्यावर ३०२ कलमान्वये तर कारवाई होईलच, पण त्यासोबतच यांच्यावर एकत्रित अनेक गुन्हे आहेत. त्यामुळे हे सगळे मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात. त्यांच्यावर मकको लावून तडीपार केलं जाईल. जे लोक या गुन्ह्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सामील आहेत त्यांनाही संघटित गुन्हेगारीचा भाग समजून मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल," अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.