सात नापास ठाणेदारांवर होणार कारवाई
By Admin | Updated: April 29, 2017 02:47 IST2017-04-29T02:47:50+5:302017-04-29T02:47:50+5:30
तक्रार नोंदवून न घेता फिर्यादीला परत पाठविणाऱ्या अमरावती परिक्षेत्रातील सात ठाणेदारांवर कारवाई होणार आहे.

सात नापास ठाणेदारांवर होणार कारवाई
राजेश निस्ताने / यवतमाळ
तक्रार नोंदवून न घेता फिर्यादीला परत पाठविणाऱ्या अमरावती परिक्षेत्रातील सात ठाणेदारांवर कारवाई होणार आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी पाचही जिल्हा पोलीस अधीक्षकांना यासंंबंधीचे आदेश जारी केले आहेत.
पोलीस महासंचालक कार्यालयाच्या आदेशावरून अमरावती परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांत प्रत्येकी दोन पोलीस ठाण्यांत ‘स्टिंग आॅपरेशन’ करण्यात आले होते. त्यासाठी बनावट फिर्यादी उभा करून त्याला पोलीस काय ट्रीटमेंट देतात, याची शहानिशा करण्यात आली. बऱ्याच ठिकाणी त्याकरिता महिला फिर्यादींची मदत घेण्यात आली.
या चाचणी परीक्षेत दहापैकी केवळ तीन ठाणेदार पास तर सात नापास झाले. या सात पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद नोंदवून न घेता ती चौकशीत ठेवण्यात आली, त्यांना परत पाठविण्यात आले. या सात ठाणेदारांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.