सहा ट्रॉलर्सवर केळवे समुद्रात कारवाई; बेकायदेशीररीत्या पर्ससीन पद्धतीने मासेमारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 09:39 IST2025-12-15T09:39:04+5:302025-12-15T09:39:29+5:30
खंडोबा, लक्ष्मीनारायण, वैष्णवी, मोरया, हिंगलाई देवी आणि महालक्ष्मी या ट्रॉलर्स केळवे समुद्राच्या समोर ८ नॉटिकल क्षेत्रात मासेमारी करताना आढळल्या.

सहा ट्रॉलर्सवर केळवे समुद्रात कारवाई; बेकायदेशीररीत्या पर्ससीन पद्धतीने मासेमारी
हितेन नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : केळवे गावाच्या समुद्राच्या ८ नॉटिकल भागात बेकायदेशीररीत्या पर्ससीन पद्धतीने मासेमारी करणाऱ्या रायगड, मुंबई येथील ६ ट्रॉलर्सवर सहायक मत्स्य व्यवसाय अधिकारी पालघरच्या गस्ती नौकेने शनिवारी कारवाई केली. १२ नॉटिकल या प्रतिबंधित क्षेत्रात माशांच्या थव्याचा शोध घेत शेकडो ट्रॉलर्सची घुसखोरी सुरू असून, फक्त एक लाख रुपयांचा दंड ठोठावला जात असल्याने या ट्रॉलर्स पुन्हा प्रतिबंधित क्षेत्रात शिरकाव करीत आहेत.
खंडोबा, लक्ष्मीनारायण, वैष्णवी, मोरया, हिंगलाई देवी आणि महालक्ष्मी या ट्रॉलर्स केळवे समुद्राच्या समोर ८ नॉटिकल क्षेत्रात मासेमारी करताना आढळल्या. उत्तनचे परवाना अधिकारी पवन काळे आणि एडवणच्या डॉ. मीना टेंबोर्ड यांनी जय जीवदानी या गस्ती नौकेच्या साहाय्याने पाठलाग करीत या ६ ट्रॉलर्सवर कारवाई केली. त्या नायगाव बंदरात आणल्याची माहिती मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त दिनेश पाटील यांनी दिली. त्यांच्याकडे असलेल्या माशांचा तीन लाख २६ हजारांचा लिलाव करण्यात आला असून, ही रक्कम शासनाकडे जमा करणार असल्याची माहिती त्यांनी 'लोकमत'ला दिली.
इइझेड क्षेत्रात परवानगी
पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या क्षेत्रात शिरकाव करून मासे पकडून नेणाऱ्या पर्ससीन, एलईडी या घातक मासेमारी विरोधात अनेक आंदोलने केल्यानंतर राज्य सरकारने या दोन्ही पद्धतीच्या मासेमारीवर बंदी घातली होती. मात्र रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातील ट्रॉलर्समालकांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर आता केंद्र सरकारने १२ नॉटिकल समुद्री क्षेत्राच्या पुढे (इइझेड क्षेत्रात) पर्ससीन मासेमारीला परवानगीचा अध्यादेश काढला आहे.
वारंवार दंड भरून घुसखोरी
मच्छीमारांसाठी राखीव असलेल्या १२ नॉटिकल क्षेत्रात घुसखोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. एका महिन्यात १२ ट्रॉलर्सवर पालघरच्या सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाने कारवाई केली आहे. धनदांडग्या ट्रॉलर्समालकांना मत्स्य व्यवसाय खात्याकडून ठोठावलेला एक लाख रुपयांचा दंड ते सहज भरू शकत असल्याने पुन्हा पुन्हा प्रतिबंधित क्षेत्रात येऊन मासेमारी करण्याचे त्यांचे प्रमाण वाढले आहे.