शक्तिपीठ महामार्ग निर्मितीच्या निर्णयाला कृती समितीचा विरोध; राज्य सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 05:49 IST2024-12-08T05:48:32+5:302024-12-08T05:49:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : राज्यातील नवनिर्वाचित देवेंद्र फडणवीस सरकारने शक्तिपीठ महामार्ग निर्मितीचा निर्णय तत्काळ रद्द करावा अन्यथा मराठवाडा ...

शक्तिपीठ महामार्ग निर्मितीच्या निर्णयाला कृती समितीचा विरोध; राज्य सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : राज्यातील नवनिर्वाचित देवेंद्र फडणवीस सरकारने शक्तिपीठ महामार्ग निर्मितीचा निर्णय तत्काळ रद्द करावा अन्यथा मराठवाडा शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समिती लातूरच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्ग करणार, अशी घोषणा केली. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शक्तिपीठ महामार्ग रद्द करणार, अशी घोषणादेखील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावर
विराजमान झाल्याबरोबर घोषणा केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
सध्या मराठवाड्यात ज्या पट्ट्यातून महामार्ग जातोय त्या पट्ट्यात बागायती शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. ऊस, केळी, हळद, भुईमूग, फळबागा, द्राक्ष इ. बागायती पिके घेतली जातात. तसेच या पट्ट्यात सुपीक माती आणि पाण्याची उपलब्धता असल्याने झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सोबतच दाट लोकवस्ती असून, अल्पभूधारक कुटुंबांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
शक्तिपीठ महामार्गसारखा प्रकल्प येथील स्थानिक जनजीवनावर खूप दूरगामी परिणाम करणार आहे. त्यामुळे या भागातून हा महामार्ग नेणे उचित नसल्याचे कृती समितीने
म्हटले आहे.
...तर आंदोलन तीव्र करावे लागेल...
७ मार्च २०२४ च्या अधिसूचनेला आव्हान देणारे आक्षेप शेतकरी आणि नागरिकांनी नोंदविले आहेत. याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे.