आरोपींची होणार नार्को चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 03:51 IST2016-07-31T03:51:39+5:302016-07-31T03:51:39+5:30
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन हत्या झाल्याच्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात

आरोपींची होणार नार्को चाचणी
अहमदनगर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन हत्या झाल्याच्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात असून, तपासी पथकाने या घटनेतील आरोपींची नार्कोसह अन्य मानसशास्त्रीय चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे़ शनिवारी जिल्हा सत्र न्यायालयाकडे आरोपींच्या मानसशास्त्रीय चाचण्यांसाठी विनंती अर्ज करण्यात आला आहे़
आरोपींची संमती व न्यायालयाच्या निर्णयानंतर या चाचण्या घेण्यात येणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व कोपर्डी प्रकरणातील तपासी अधिकारी शशिराज पाटोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ कोपर्डी प्रकरणातील जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे, नितीन भैलुमे व संतोष भवाळ या तीनही आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे़ पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेऊन पंचनामा केला़ तसेच घटनेची सविस्तर माहिती घेत या प्रकरणी पुरावे एकत्र केले आहेत़ (प्रतिनिधी)
।आरोपींना न्यायालयीन कोठडी
कोेपर्डी प्रकरणातील दोन आरोपी नितीन भैलुमे व संतोष भवाळ यांना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारी न्यायालयीन कोठडी सुनावली़ या घटनेतील जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याच्यासह हे दोन आरोपी आता न्यायालयीन कोठडीत राहणार आहेत़ त्यांची रवानगी कर्जत कारागृहात करण्यात आली आहे़ या घटनेतील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याच्यावर जिल्हा न्यायालय परिसरात दोन वेळा हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने पोलिसांनी शनिवारी मोठा बंदोबस्त तैनात केला होता़
या चाचण्या होणार : मानसशास्त्रीय चाचण्यांसाठी आरोपींची परवानगी आवश्यक असते़ आरोपींची संमती मिळाली तरच या चाचण्या केल्या जातात़ न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर कोपर्डी प्रकरणातील आरोपींची ‘नार्को’, ‘ब्रेन मॅपिंग’, ‘लायडिटेक्टर’, ‘पोलिग्राफ’ या चाचण्या घेण्यात येणार आहेत़