पोलिसांच्या ‘उमंग’मध्ये गायला आरोपी

By Admin | Updated: January 13, 2015 05:07 IST2015-01-13T05:07:51+5:302015-01-13T05:07:51+5:30

बलात्काराचा गुन्हा नावावर असलेला नवोदित पार्श्वगायक अंकित तिवारी याने मुंबई पोलिसांच्या ‘उमंग’ कार्यक्रमात सादरीकरण केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे

The accused accused of singing in police's 'Umang' | पोलिसांच्या ‘उमंग’मध्ये गायला आरोपी

पोलिसांच्या ‘उमंग’मध्ये गायला आरोपी

मुंबई : बलात्काराचा गुन्हा नावावर असलेला नवोदित पार्श्वगायक अंकित तिवारी याने मुंबई पोलिसांच्या ‘उमंग’ कार्यक्रमात सादरीकरण केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. याबाबत पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी चूक झाल्याची कबुली देत माफी मागितली. मात्र त्याचवेळी कार्यक्रमाचे आयोजन एका खासगी संस्थेला देण्यात आले होते. याच संस्थेने तिवारीला बोलावल्याचे मारिया यांनी स्पष्ट केले.
अंधेरीच्या शहाजी राजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सवर रंगलेल्या उमंगच्या स्टेजवर तिवारी गाणे गाण्यासाठी आला तेव्हा माझ्यासह अनेक पोलीस अधिकारी आश्चर्यचकित झाले. त्याला अडविणार इतक्यात त्याने गाणे सुरूही केले. गाणे संपताच त्याला स्टेजवरून बाजूला करण्यात आले आणि पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आला, असे मारिया यांनी सांगितले.
मुळात उमंगच्या आयोजनाची जबाबदारी सिनेयुग या खासगी संस्थेकडे सोपविण्यात आली होती. या कार्यक्रमात वादग्रस्त कलाकार नकोत किंवा ज्यांच्यामुळे वाद निर्माण होऊ शकतात असे कलाकार नकोत, अशा स्पष्ट सूचना सिनेयुगला देण्यात आल्या होत्या. असे असताना तिवारी स्टेजवर कसा आला याची चौकशी केली जाईल, असे स्पष्ट करतानाच भविष्यात अशी चूक होणार नाही याची काळजी घेऊ, असाही विश्वास व्यक्त केला. उमंगची पूर्वतयारी सुरू असताना वादग्रस्त ठरतील अशा सात ते आठ कलाकारांच्या नावांवर मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फुली मारल्याची माहिती मिळते. याबबात मारिया यांना विचारले असता त्यांनी फुली मारलेल्या कलाकारांची नावे सांगण्यास नकार दिला.मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाच्या मनोरंजनासाठी दरवर्षी उमंग या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. (प्रतिनिधी)

Web Title: The accused accused of singing in police's 'Umang'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.