उपराजधानीत ‘मेडिकल हब’ होण्याची क्षमता
By Admin | Updated: September 12, 2014 00:51 IST2014-09-12T00:51:16+5:302014-09-12T00:51:16+5:30
उपराजधानीतील वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकास दिसून येत आहे. नागपुरात आंतरराष्ट्रीय नकाशावरील ‘मेडिकल हब’ होण्याची क्षमता असून सध्याचा वेग पाहता लवकरच ही बाब प्रत्यक्षात येईल,

उपराजधानीत ‘मेडिकल हब’ होण्याची क्षमता
फ्रान्सचे कॉन्सेल जनरल पेत्रेग्ने यांचा विश्वास : दोन दिवसीय दौरा सुरू
नागपूर : उपराजधानीतील वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकास दिसून येत आहे. नागपुरात आंतरराष्ट्रीय नकाशावरील ‘मेडिकल हब’ होण्याची क्षमता असून सध्याचा वेग पाहता लवकरच ही बाब प्रत्यक्षात येईल, असा विश्वास फ्रान्सचे मुंबई येथील कॉन्सेल जनरल जीन राफेल पेत्रेग्ने यांनी व्यक्त केला. पेत्रेग्ने हे दोन दिवसांसाठी नागपूरच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नागपुरात लवकरच ‘एम्स’ची निर्मिती होणार आहे. ही शहरासाठी नक्कीच एक मोठी संधी असून यातून आणखी प्रगती साधली पाहिजे. ‘मेडिकल हब’ म्हणून नागपूरचे नाव व्हावे यासाठी फ्रान्सकडून शक्य ती सर्व मदत करण्यात येईल, असे आश्वासन पेत्रेग्ने यांनी यावेळी दिले. पेत्रेग्ने यांच्यासमवेत फ्रान्सचे व्यवसाय आयुक्त (ग्राहक वस्तू व आरोग्यसेवा विभाग) मॅश्यू लेफोर्ट हेदेखील उपस्थित होते. मुंबई, कोलकाता व बंगळुरु येथे फ्रान्सच्या कॉन्सेल जनरलची कार्यालये आहेत. पेत्रेग्ने यांच्याकडे महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात व गोवा येथील जबाबदारी आहे. नागपूर व फ्रान्सदरम्यान जास्तीत जास्त व्यापार वाढावा यासाठी त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे.
फ्रान्सला हवेत भारतीय विद्यार्थी
फ्रान्समध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या फारच कमी आहे. फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणावर चांगल्या शैक्षणिक संस्था असून भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे पेत्रेग्ने यांनी सांगितले. चीनमध्ये आजच्या तारखेत ३० हजार भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहे. फ्रान्समध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा आकडा हा ३ हजारांच्या जवळपास आहे. फ्रान्समध्ये फ्रेंच भाषेतील शिक्षणाला महत्त्व दिले जाते. त्यामुळे भारतीय विद्यार्थी तिकडे येण्यास फारसे इच्छुक नसतात. परंतु विद्यापीठ, शाळा व महाविद्यालयांत इंग्रजीत शिक्षण देण्याची परवानगी देणाऱ्या कायद्याला फ्रेंच सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. यामुळे नक्कीच विदेशातील विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, असे पेत्रेग्ने म्हणाले. यासोबतच विद्यार्थ्यांना सुलभतेने ‘व्हिसा’ मिळावा यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यात विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच काम करण्याची संधी मिळू शकते. जो विद्यार्थी फ्रान्समधील विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेईल त्याला मोफत ‘लाईफटाईम व्हिसा’ देण्यासंदर्भात विचार सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली.(प्रतिनिधी)
व्यापारिक संधींचा शोध
पेत्रेग्ने यांनी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सदस्यांशी भेट घेतली. नागपूर व फ्रान्सदरम्यान निरनिराळ्या व्यापारिक तसेच उद्योगक्षेत्राशी निगडित संधी वाढाव्यात तसेच कुठल्या क्षेत्रात एकत्रितपणे काम करता येईल यासाठी या भेटीत चर्चा झाली. नागपूरच्या उद्योगक्षेत्रात फ्रान्सचा सहभाग तसेच नागपुरातील कंपन्यांकडून फ्रान्समध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात काय प्रयत्न करण्यात येतील यावरदेखील प्रकाश टाकण्यात आला.