महाराष्ट्र सरकारच्या निर्देशानुसार आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने दादर कबुतरखान्यात कबुतरांना खायला टाकण्यास अधिकृतपणे बंदी घातली. त्यानुसार, महापालिकेने शहरातील कबुतरखान्यांवर कारवाई सुरू केली. दरम्यान, शनिवारी महापालिकेचे कर्मचारी दादर येथील कबुतरखाना तोडण्यासाठी आले असताना स्थानिकांनी विरोध दर्शवला. त्यामुळे ही कारवाई लांबणीवर पडली असून परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
कबुतरखान्याच्या मुद्द्यावर बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शब्दात निशाणा साधला. ते म्हणाले की, “कबुतरं म्हणजे शिंदे यांच्या आमदारांसारखी नाहीत की त्यांना कंट्रोल फीडिंग करावे लागेल. मुंबईचे पालकमंत्री असूनही त्यांनी महानगरपालिकेला कबुतरखाने बंद करण्यासाठी पत्र लिहिले, ही गोष्ट धक्कादायक असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. स्थानिक नागरिकांच्या भावना आम्ही समजून घेतो आणि त्यांचा आदर करतो, असंही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, मंत्री लोढा वरळी सी-फेसवर स्वतःचा बंगला बांधत आहेत, तिथे कबुतरांसाठी योग्य व्यवस्था करता येईल, अशा शब्दांत त्यांनी लोढांवरही टोला लगावला.
माधुरी हत्तीणीच्या स्थलांतरावरून सरकारला सवालन्यायालयाने माधुरी हत्तीणीला वनतारा येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय दिला आहे. मात्र, आदित्य ठाकरेंनी माधुरी हत्तीणी ही महाराष्ट्रातच राहावी, अशी इच्छा व्यक्त केली. या संदर्भात आपण स्वतः वनतारा प्रशासनाशी संवाद साधला असून माधुरी हत्तीणीची योग्य देखभाल एखाद्या चांगल्या संस्थेकडून व्हावी, असे मत त्यांनी मांडले. तसेच, या निर्णयाविरोधात राज्य सरकार न्यायालयात कोणती भूमिका घेणार आहे? किंवा सरकार खरोखरच याविरोधात कोर्टात जाणार आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
बीडीडी चाळीतील रहिवाशांचा गणेशोत्सव नवीन घरात साजरा व्हावाबीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील घरांच्या चाव्या वाटपावरून सध्या सत्ताधारी पक्षामध्ये श्रेय घेण्याची चढाओढ सुरू आहे, अशी टीका आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरेंनी वांद्रे पूर्व येथील म्हाडा कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच लवकरात लवकर बीडीडी चाळीतील रहिवाशांचा घराच्या चाव्या देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. येणारा गणेशोत्सव रहिवाशांनी त्यांच्या नव्या घरातच साजरा करावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.