Anil Parab Latest News: 'छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ केला गेला आणि आमचा पक्ष बदलण्यासाठी केला गेला', असे विधान अनिल परब यांनी विधान परिषदेत केले. त्यांच्या या विधानावरून सत्ताधाऱ्यांनी विधान परिषदेत गोंधळ घातला. परब यांनी माफी मागावी अशी मागणी सभागृह नेते प्रविण दरेकर यांच्यासह सत्ताधारी बाकावरील आमदारांनी केली. यावेळी नितेश राणे यांनीही मातोश्रीची फरशी चाटायचं काम यांनी केलं आहे, अशी टीका परबांवर केली. त्यावरून परब चांगलेच संतापले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! अनिल परब यांनी माफी मागावी, अशी मागणी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली. त्यावरून विधान परिषदेत गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं. या मुद्द्यावर बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, महाविकास आघाडीची सत्ता असताना यांनी लोकांची घरे तोडली. कारकुनाचा कोणी छळ करू शकत नाही. यांनी केंद्रीय मंत्र्याला अटक केली. जैसी करणी वैसी भरणी आहे. मातोश्रीची फरशी चाटायचं काम यांनी केलं. मातोश्री बाहेर झोपण्याचं काम यांनी केलं आहे. यांना दाखवायचं आहे की, आपण किती शूर आहोत", अशी टीका नितेश राणेंनी केली.
कोण उठतोय आणि बोलतंय, अनिल परबांचा पलटवार
अनिल परब म्हणाले, "माझं भाषण आपण पूर्ण तपासून घ्यावं. छत्रपती संभाजी महाराज माझ्यासाठी दैवत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या पायावर डोकं ठेवायला मला कधीच लाज वाटणार नाही. ते माझे देव आहेत. मी काल काय बोललो हे आपण तपासून घ्या. तुम्हाला असं वाटतं असेल की, मी त्यांचा आपण केला, तर तुम्हाला अधिकार आहे कामकाजातून काढून टाकण्याचा. परंतु तो आपला अधिकार आहे. कोण उठतोय आणि बोलतंय, याच्याबद्दल आम्हाला पण बोलावं लागेल", असे अनिल परब विधान परिषद सभापतींना म्हणाले.
समज देण्याचा अधिकार तुम्हाला, हे कोण आहेत? -अनिल परब
अनिल परब म्हणाले, "सभागृहाच्या मर्यादा या दोन्ही बाजूंनी सांभाळल्या गेल्या पाहिजेत. ते सांभाळून घ्यायची जबाबदारी आपली (सभापती) आहे. आपण आमचे सर्वस्व आहात. आपल्याला सर्व अधिकार आहेत. माझ्या तोंडून एखादा चुकीचा शब्द गेला असेल, तर कामकाजातून काढण्याचा आणि मला समज देण्याचा अधिकार तुम्हाला आहे. या लोकांना नाहीये. हे कोण आहेत?", असा सवाल अनिल परब यांनी विधान परिषदेत नितेश राणे आणि इतरांचे नाव न घेता केला.
परबांनी कुत्र्याच्या नावावरून भाजपला घेरलं?
"मी काल काय बोललो की, छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ केला गेला आणि आमचा पक्ष बदलण्यासाठी केला गेला. यात चुकीचे काय बोललो? तरीदेखील आपल्याला वाटत असेल की, मी काही चुकीचे बोललो, तर तो आपला अधिकार आहे. पण या सभागृहातील एका सदस्याने आपल्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवलं आहे. श्रीकांत भारतीय, त्यांची माफी आधी घ्या. ह्या गुढीपाडव्याला. त्याची माफी मागणार का? कोरटकर, सोलापूरकरांचा विषय बाजूला काढावा म्हणून हा विषय आलाय. तरी पण मी आपल्या अधिकार देतो", असे प्रत्युत्तर अनिल परबांनी विरोधकांना विधान परिषदेत दिलं.