कांदा शेतकऱ्याची थट्टा; व्यापाऱ्याला प्रशासनाचा दणका
By Appasaheb.patil | Updated: February 27, 2023 08:00 IST2023-02-27T07:59:19+5:302023-02-27T08:00:08+5:30
दोन रुपयांचा दिला चेक : १५ दिवसांसाठी परवाना रद्द

कांदा शेतकऱ्याची थट्टा; व्यापाऱ्याला प्रशासनाचा दणका
- अप्पासाहेब पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : १० पोते कांदा विकल्यावर सर्व खर्च वजा जाता फक्त २ रुपयांची पट्टी निघाली तीही रोख न देता पुढील तारखेचा चेक दिला. अशा पध्दतीने शेतकऱ्याची क्रूर थट्टा करणाऱ्या व्यापाऱ्यावर बाजारसमितीने कारवाई केली आहे. त्याचा परवाना १५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सी.ए. बिराजदार यांनी दिली.
अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव येथील राजेंद्र तुकाराम चव्हाण या शेतकऱ्याने सोलापुरातील बाजार समितीत १० पोते कांदे विकण्यास आणले होते. खर्च वजा जाता केवळ दोन रुपये ४९ पैसे इतकी पट्टी निघाली. शेतकऱ्याच्या थट्टेबाबत सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत होत्या.
याबाबत बाजार समितीने एक परिपत्रकच काढले असून जे व्यापारी शेतकऱ्यांना रोख पट्टी देणार नाहीत, त्यांच्यावर बाजार समितीकडून कारवाई करण्यात येणार असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पुढील तारखेचा चेक
n१० पिशव्या कांद्याचे वजन ५१२ किलो झाले. विकलेला कांदा, त्याचे वजन आणि भाव पाहता कांद्याचे एकूण ५१२ रुपये झाले.
nत्यामधून हमाली ४०.४५ रुपये, तोलाई २४.०६ रुपये, मोटारभाडे १५, रोख उचल ४३० असा खर्च वजा जाता १० पोते कांदे विकल्यावर फक्त २ रुपये ४९ पैसे पट्टी मिळाली.
nया पट्टीची चिठ्ठी अन् अडत्याने शेतकऱ्याला दिलेला चेक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर बाजार समितीने पट्टी रोख न देता चेक दिल्याने कारवाई केली.