ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 09:40 IST2025-04-29T09:38:30+5:302025-04-29T09:40:06+5:30
Datta Dalvi - Eknath Shinde: गेल्या काही वर्षांपासून ठाकरे गटात दत्ता दळवी नाराज असल्याची वृत्ते येत होती. डावलले जात असले तरी शिंदेंनी शिवसेना फोडली तेव्हा देखील दळवी ठाकरेंसोबत राहिले होते.

ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
२०२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भर सभेत शिवी घालणारे मुंबईचे माजी महापौर, ठाकरे गटाचे शिलेदार समजले जाणारे दत्ता दळवी हे शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून ठाकरे गटात दत्ता दळवी नाराज असल्याची वृत्ते येत होती. डावलले जात असले तरी शिंदेंनी शिवसेना फोडली तेव्हा देखील दळवी ठाकरेंसोबत राहिले होते. परंतू, आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दत्ता दळवी शिंदे गटात सहभागी झाले आहेत.
तळकोकणातील उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांना एकेक करून शिवसेनेत घेतले जात आहे. काही महिन्यांपूर्वीच राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता मुळचे सिंधुदूर्गचे असलेले, मुंबई महापालिकेचे महापौर राहिलेले दत्ता दळवी यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे.
महत्वाचे म्हणजे याच दत्ता दळवी यांनी २०२३ मध्ये भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांचा जाहीर मेळाव्यात एकनाथ शिंदेंना शिवीगाळ केली होती. एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या 'हिंदुह्रदयसम्राट' या उपमेवरून ही शिविगाळ करण्यात आली होती. याविरोधात भांडूप पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दत्ता दळवी यांना घरातून अटकही करण्यात आली होती. आता याच नेत्याला शिंदेंनी पक्षात घेतल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे आणि शिंदे गटात वर्चस्वावरून स्पर्धा रंगू लागली आहे. भाजपाने मुंबई महापालिकेत आपले चांगले बस्तान विस्तारलेले आहे. यामुळे शिंदे गटामध्ये धाकधुक आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावरून चर्चा रंगली होती. दोन्ही ठाकरेंनी तशी विधाने केली होती. यावरूनही शिंदे गटात अस्वस्थता होती. दत्ता दळवी देखील मातोश्रीवरून डावलले जात असल्याने नाराज होते. कोकणपट्ट्यात मागील काही लोकसभा, विधानसभा निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती. परंतू, गेल्या काही वर्षांपासून त्यांना डावलले जात होते. यावरून दळवींनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती.