९० टक्के बीपीएड महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर
By Admin | Updated: July 13, 2016 18:50 IST2016-07-13T17:34:28+5:302016-07-13T18:50:21+5:30
दोन वर्षांचा अभ्यासक्रम आणि कमी विद्यार्थी संख्येच्या अभावी राज्यातील सुमारे 100 शारीरिक शिक्षण महाविद्यालयांपैकी ९० टक्के महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर

९० टक्के बीपीएड महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 13 - दोन वर्षांचा अभ्यासक्रम आणि कमी विद्यार्थी संख्येच्या अभावी राज्यातील सुमारे 100 शारीरिक शिक्षण महाविद्यालयांपैकी ९० टक्के महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. राज्य शासनानेही राज्यातील केवळ नऊ महाविद्यालयांनाच नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे.
बी. पी. एड. अभ्यासक्रमासाठी गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थी संख्या रोडावत चालली आहे. यंदाही विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. राज्य सरकारने अभ्यासक्रम दोन वर्षांचा केल्याने तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शारीरिक शिक्षक पदे रद्द केल्याचा हा परिणाम असल्याचा आक्षेप एकीकडे घेतला जात असतानाच राज्य सरकारच्या निर्णयामुळे या क्षेत्रात विनाअनुदानित तत्त्वावर चाललेल्या शिक्षणाच्या धंद्यालाही लगाम बसणार असल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत.
राज्यातील बी. पी. एड. अभ्यासक्रमासाठी यंदा सामायिक प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) घेण्यात येत आहे. ५ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांकडून आॅनलाईन अर्ज मागविले आहेत. राज्यातील सुमारे शंभर महाविद्यालयांत १० हजार पटसंख्या आहे. मात्र, यंदा सीईटीसाठी केवळ १३८० अर्ज आल्याची माहिती मिळाली. या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा म्हटले तरी केवळ नऊ ते दहा महाविद्यालयेच चालू शकतात. शिवाय राज्य सरकारने राज्यात केवळ नऊ महाविद्यालयांनाच नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने उर्वरित महाविद्यालयांना बी.पी.एड. अभ्यासक्रम बंद करण्याशिवाय मार्गच उरला नाही.
राज्य सरकारने केवळ नऊ महाविद्यालयांना नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने उर्वरित नव्वद टक्के अभ्यासक्रम बंद करणार आहेत का, असा सवाल बी. पी. एड. महाविद्यालयांतील प्राध्यापकांकडून केला जात आहे. त्याच वेळी विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये बाहेरच्या राज्यांतील विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या वेळी प्रवेश देऊन अनेक संस्थाचालक आपले उखळ पांढरे करून घेत असल्याचे चित्र आहे. कोणत्याही प्रकारचा दर्जा आणि मैदाने नसतानाही अशी महाविद्यालये चालत असल्याचे चित्र आहे.
नाहरकत प्रमाणपत्र दिलेली महाविद्यालये
चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पुणे, शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, विशुद्ध महाविद्यालय यवतमाळ यांचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे महाविद्यालय (सर्व अमरावती), मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे महाविद्यालय, औरंगाबाद, नवगण शिक्षण संस्थेचे महाविद्यालय, बीड, बॉम्बे फिजिकल कल्चर असोसिएशनचे कॉलेज आॅफ फिजिकल एज्युकेशन, मुंबई, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे महाविद्यालय, बार्शी (जि. सोलापूर), क्रीडा मंडळ नागपूरचे महाविद्यालय, धंतोली, ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय, हनुमाननगर (दोन्ही नागपूर),
एम. पी. एड. साठी गर्दी
दोन वर्षाच्या एम. पी. एड. अभ्यासक्रमासाठी मात्र उलट स्थिती आहे. राज्यभरातील तीस महाविद्यालयांमध्ये एम.पी. एड, अभ्यासक्रमाच्या ३५० जागा आहेत. तर प्रवेशासाठी आठशेच्या वर ार्थी संख्या आहे. यामुळे एम. पी. एड. साठी राज्यात चांगली स्थिती असल्याचे दिसते.