एसटी कर्मचाऱ्यांचे ८० कोटी थकले, सप्टेंबर २०२३ पासूनच्या निवृत्तांंची रक्कम थकीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 14:18 IST2025-05-20T14:12:51+5:302025-05-20T14:18:41+5:30
एसटी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर शिल्लक सुट्ट्यांचे पैसे मिळावेत, यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेमार्फत वारंवार कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र तरीही याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे संंघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांचे ८० कोटी थकले, सप्टेंबर २०२३ पासूनच्या निवृत्तांंची रक्कम थकीत
मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) सुमारे २४०० निवृत्त कर्मचाऱ्यांच्या शिल्लक रजांची रक्कम सप्टेंबर २०२३ पासून देण्यात आलेली नसून ही थकीत रक्कम सुमारे ८० कोटी रुपयांच्या घरात पोचली आहे. महामंडळाची आर्थिक स्थिती अडचणीत असल्यामुळे ही देयके रखडल्याचे कारण अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
नियमानुसार, निवृत्त कर्मचाऱ्यांना न वापरलेल्या रजांची रक्कम तत्काळ अदा करणे बंधनकारक आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या नियमाला हरताळ फासला गेला आहे. या मुद्द्यावर जबाबदारी स्वीकारण्यास अधिकारी टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर शिल्लक सुट्ट्यांचे पैसे मिळावेत, यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेमार्फत वारंवार कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र तरीही याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे संंघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांना महिन्याला साडेतीन दिवस आणि वर्षाला सरासरी ३६ दिवस रजा मिळतात.
निवृत्तीवेळेस साधारण ३०० शिल्लक रजांचे पैसे दिले जातात.
सुमारे २४०० पेक्षा जास्त कर्मचारी दोन वर्षांपासून वेटिंगवर आहेत.
निवृत्तीनंतरची सर्व देणी तत्काळ देण्याचे शासनाचे परिपत्रक आहे; पण एसटीमध्ये मात्र निवृत्त कर्मचारी व अधिकारी यांना शिल्लक रजेच्या पैशासाठी फेऱ्या माराव्या लागत आहेत, हे दुर्दैवी आहे.
श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी, काँग्रेस