5 मित्रांसाठी 'त्यानं' केली 8 वर्षांनंतर आत्महत्या
By Admin | Updated: July 28, 2016 22:49 IST2016-07-28T22:49:18+5:302016-07-28T22:49:18+5:30
5 मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे आजपर्यंत सतत अस्वस्थ असणाऱ्या पित्याने 'हाय-वे'वर त्याच ठिकाणी जाऊन आत्महत्या केली

5 मित्रांसाठी 'त्यानं' केली 8 वर्षांनंतर आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
शिरवळ ( सातारा ), दि. 28 - आठ वर्षांपूर्वी आपल्या आजारी मुलाला दवाखान्यात पाहायला येताना 5 मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे आजपर्यंत सतत अस्वस्थ असणाऱ्या पित्याने 'हाय-वे'वर त्याच ठिकाणी जाऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी खंबाटकी घाटात घडली.
'ही दोस्ती तुटायची नाय...' हे चित्रपटातील बोल आठवावेत, असा हा प्रकार. वसंत महादेव शिंदे ( वय 46, सध्या रा. पेटकर कॉलनी, रविवार पेठ वाई, मूळ रा. कार्वे ता.माळवा जि.सांगली) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. शिंदे हे वाईतील एका कारखान्यात काम करायचे. त्यांचा मुलगा 8 वर्षांपूर्वी आजारी पडल्याने दवाखान्यात उपचार घेत होता.
त्यावेळी त्यांच्या आजारी मुलाला पाहण्यासाठी कारखान्यातील त्यांचे पाच सहकारी खासगी जीपने दवाखान्यात येत होते. मात्र, दुर्दैवाने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटानजीक झालेल्या अपघातात त्यांचे पाचही जीवलग मित्र ठार झाले. तेव्हापासून वसंत शिंदे अत्यंत हळवे झाले होते. दर दोन-चार दिवसाला घाटातील अपघात स्थळी येऊन मित्रांच्या आठवणीने ते रडत बसायचे. हा प्रकार गेली 8 वर्षे सातत्याने सुरु होता.
दरम्यान, गुरुवारी शिंदे यांचा मृतदेह या ठिकाणी आढळून आला. त्यांच्या खिशातील ओळखपत्रावरुन पोलिसांनी कारखान्यात संपर्क साधला, तेव्हा हा सारा इतिहास स्पष्ट झाला. त्यांनी विषप्राशन केल्याचे पोस्टमार्टममध्ये कळून चुकले. मित्रांच्या मृत्यूचे दुःख वारंवार उफाळून येत असल्यानेच या कामगाराने अपघातस्थळी विषप्राशन करत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समजताच परिसरात अत्यंत हळहळ व्यक्त करण्यात आली