आरटीओत ७३.७६ लाखांचा अपहार

By Admin | Updated: January 13, 2015 05:06 IST2015-01-13T05:06:51+5:302015-01-13T05:06:51+5:30

मोटार वाहन कर, दंड, व्यवसाय करापोटी जमा होणारी रक्कम लेखाकोषागारात न भरता तब्बल दोन वर्षे वापरली गेली. ही बाब महालेखापालांनी उघडकीस आणल्यानंतर

73.76 lakh aprons in RTO | आरटीओत ७३.७६ लाखांचा अपहार

आरटीओत ७३.७६ लाखांचा अपहार

अतुल कुलकर्णी, मुंबई
मोटार वाहन कर, दंड, व्यवसाय करापोटी जमा होणारी रक्कम लेखाकोषागारात न भरता तब्बल दोन वर्षे वापरली गेली. ही बाब महालेखापालांनी उघडकीस आणल्यानंतर एका फटक्यात ७३.७६ लाख रुपये तातडीने भरून टाकले गेले. विशेष म्हणजे हे प्रकरण त्यानंतरही दोन वर्षे दडपण्यात आले; मात्र मुंबईतून सूत्रे हलली आणि बारामती पोलीस ठाण्यात चार अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरटीओ कार्यालयातील या गोरखधंद्याचा पर्दाफाश यानिमित्ताने उघडकीस आला असला, तरी यामागचे खरे गुन्हेगार मोकाट असल्याचे बोलले जात आहे.
बारामती तालुका पोलीस ठाण्यात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमर आनंदराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीमुळे हे प्रकरण उघडकीस आले असले, तरी अर्धवट स्वरूपाची फिर्याद हा देखील बचावाचा भाग असल्याचे वरिष्ठांचे मत आहे. २०१० ते २०१२ या कालावधीत वाहन व इतर व्यवसाय कराचा ७३.७६ लाख रुपयांचा बारामतीच्या उपकोषागार कार्यालयाने ताळमेळ घेतला नसल्याचा आक्षेप मुंबईच्या महालेखापाल व पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नोंदवला होता. ही रक्कम लेख्याबाहेर होती व ती भरण्याची जबाबदारी ज्यांची होती त्यांनी ती पार पाडली नाही. त्यांनी या रकमेचा अपहार केला असे फिर्यादीत म्हटले असून, या प्रकरणी पुण्याचे कनिष्ठ लेखापरीक्षक भांगे, तापकीर, वरिष्ठ लिपिक गोगावले व खुळे यांच्याविरुद्ध फिर्याद देण्यात आली आहे. त्यातही बनाव असा, की या चारही अधिकाऱ्यांची पूर्ण नावेदेखील फिर्यादीत दिलेली नाहीत.
विशेष म्हणजे मुंबईच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने यासंबंधी ७ जानेवारी रोजी पत्र पाठवले़ त्यानुसार ही फिर्याद देण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे. सोबत त्या पत्राची प्रतही जोडली आहे. याचा अर्थ जर असे कळवले गेले नसते, तर हे प्रकरण उघडकीस आलेच नसते. या प्रकरणी भादंवि ४०९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२०१२ साली घडलेले प्रकरण जेव्हा उघडकीस आले, त्याचवेळी गुन्हा दाखल का केला गेला नाही, चलन आणि ताळमेळ तपासण्याची जबाबदारी कोणाची होती, अपहार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर देखील मुंबई प्रादेशिक कार्यालयाने कळवेपर्यंत गुन्हा का दाखल केला गेला नाही आणि जर ७३.७६ लाखांची रक्कम एकाच चलनाद्वारे एकरकमी भरली गेली असेल तर एवढी मोठी रक्कम एकाच दिवशी कोणाच्या सहीने भरली गेली, असे एक ना अनेक प्रश्न अजुनही अनुत्तरितच आहेत.

Web Title: 73.76 lakh aprons in RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.